नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिक्रमण करणाऱ्या चीनला अरुणाचल प्रदेश येथून ललकारले. सुईच्या टोकाइतक्याही जमिनीवर आता अतिक्रमण करता येणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. चीनने गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला विरोध केला. गृहमंत्री म्हणाले, आता कोणीही आमच्या सीमेवर नजर ठेऊ शकत नाही. भारताच्या सीमेवर अतिक्रमण होत होते, तो काळ आता गेला आहे. आता कुणीही भारतीय सीमेवर अतिक्रमण करू शकत नाही. कारण आयटीबीपी आणि सेनेचे जवान सीमेवर उपस्थित आहेत.
अमित शाह म्हणाले, मोदी सरकार सीमेची सुरक्षा हीच देशाची सुरक्षा यानुसार चालते. गेल्या १२ केंद्र सरकारच्या कार्यकाळात जो विकास सीमेवर झाला नाही तो विकास मोदी यांनी आपल्या कार्यकाळात केला आहे.
काही वर्षांपूर्वी सीमेवरून पलायन करणे हा चिंतेचा विषय होता. परंतु, मोदी यांच्या नेतृत्त्वात आज सीमावर्ती भागात विकास होत आहे. देशाच्या सीमेवरील भाग मजबूत होत आहे.
अरुणाचलमध्ये कोणीही नमस्ते म्हणत नाही. सर्व जण जयहिंद म्हणून अभिवादन करतात. हे चित्र पाहून देशभक्तीची जाणीव होते. याच कारणामुळे १९६२ साली जे अतिक्रमण करण्यासाठी आले होते. त्यांना परत जावं लागलं होतं. देशात सूर्याचे पहिले किरण अरुणाचलमध्ये पडते. या भागाला उगवत्या सूर्याचा प्रदेश मानले जाते. भगवान परशुराम यांनी अरुणाचल प्रदेश हे नाव दिले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.
अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनची आगपाखड झाली. बीजिंगमध्ये चिनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबीन यांनी म्हटलं की, अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भाग शांतीसाठी योग्य नाही. आम्ही याचा विरोध करणार.
चीन अरुणाचल प्रदेशातील काही भागांचे नाव बदलण्याच्या तयारीत आहे. पण भारताने त्यांचा हा डाव उधळून लावला. अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणी चीनने गावांचे नामकरण करण्याचा प्रयत्न केला.पण, भारताने तो प्रयत्न उधळून लावला.