नवी दिल्ली | 23 वर्षांच्या लेकीला बाबांचा फोन येतो. मुलगी बंगळुरूत (Bengluru) शिकायला. आई-बाबा केरळमध्ये (Kerala). तिकडे बापाच्या मनात कसलं विचारांचं काहूर माजलं असेल, कल्पनाही करवत नाही. विषयच तसा होता. 23 वर्षांच्या लेकीला बाप गूड न्यूज देणार होता. कित्येक दिवसांपासून त्याला सांगायचं होतं. पण आईचं वय, लेकीचं वय, समाजाच्या नजरा, टोमणे या सगळ्या दडपणामुळं त्याची हिंमत होत नव्हती. अखेर त्यानं 3 च शब्दात सांगितलं. अम्मा प्रेग्नंट है.. (Amma Pregnant Hai) लग्नाच्या वयात आलेल्या या लेकीला धक्का बसणार हे साहजिकच आहे. पण ती ज्या धीरानं या प्रसंगाला सामोरं गेली,ते इथे जास्त महत्त्वाचं आहे. आई-बाबांमधलं नातं, आईचं गर्भवती असणं, तरुण वयातली लेक जेव्हा आईच्या बाळंतपणासाठी येते, या दोघींमध्ये झालेली भावनांची देवाण-घेवाण या सगळ्यांबद्दल या लेकीने अत्यंत स्पष्ट आणि मनमोकळी पोस्ट लिहिलीय. सोशल मिडियावर या लेकीची पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय.
Humans od Bombay या अकाउंटवर ही पोस्ट इस्टाग्रामवर शेअर कऱण्यात आली आहे. यात लेकीने हा सगळा प्रसंग लिहिलाय. तिने लिहिलेल्या पोस्टचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे-
लहानपणापासून मी माझ्या आईकडे नेहमी हट्ट धरला. मला छोटा भाऊ किंवा बहीण हवी आहे. पण आई सांगायची. माझ्या जन्मानंतर तिच्या गर्भाशयाला इजा झाली. त्यामुळे आमच्या घरात कधीही लहान बाळ येऊ शकत नाही. आईला कधीही गर्भधारणा होऊ शकणार नव्हती. मोठं झाल्यावर मी ते स्वीकारलं. वर्ष पुढे जात राहिली.
नुकतीच मी बंगळुरूत कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आलेय. अम्मा आणि अप्पा केरळमध्येच राहतात. अप्पांचा तो फोन येईपर्यंत सगळं सुरळीत होतं. त्या दिवशी अप्पांचा फोन आला. त्यांनी मला ती गोष्ट सांगितली. मी कशी प्रतिक्रिया देईन याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. पण त्या फोननंतर काही दिवसात मी घरी केरळला पोहोचले. धावतच आईच्या कुशीत शिरले आणि धाय मोकलून रडू लागले. मला का लाज वाटेल? कित्ती दिवसांपासून मला हेच हवं होतं…
त्या दिवसानंतर अम्मा आणि मी खूप वेळ एकत्र घालवू लागलो. घरी गेल्यावर मला सगळा खुलासा झाला. अम्मा आणि अप्पा एक दिवस मंदिरात गेल्यावर अम्मा चक्कर येऊन पडली. खूप अशक्तपणा आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं ती प्रेग्नंट आहे. काही कारणांमुळे तिचं पोट दिसत नव्हतं. अम्माची मासिक पाळी थांबली होती. पण तिला वाटलं मेनोपॉज आला. अनेक महिने गॅप पडल्यामुळे प्रेग्नंट राहूत, अशी कल्पनाही तिच्या मनाला शिवली नव्हती.
हळू हळू आम्ही कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींना हे सांगायला सुरुवात केली. काहींनी आपुलकीनं चौकशी केली. काहींनी टोमणे मारले. पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. अम्माचं बाळंतपण चांगलं झालं. घरात कुठेही तणावाचं वातावरण नव्हतं.
एक आठवडा झालाय. आईने मुलीला जन्म दिलाय. आयुष्यात आणखी काय हवं. ती कधी एकदा मला दीदी म्हणेल.. माझे कान आसुसलेत. मला माहितीय. लोकांना हे विचित्र वाटेल. आमच्या वयात खूप फरक आहे. पण हे तितकं महत्त्वाचं आहे का? हे खूप गमतीशीर आहे. एवढी वर्ष आम्हाला माहितही नव्हतं..ती आमच्या घरी येतेय. आमच्या आयुष्यात येतेय… आता ती आलीय. त्यामुळे तिच्यापासून दूर जाण्याची अजिबात इच्छा नाही…