नवी दिल्ली, राजधानी दिल्लीपासून 212 किमी अंतरावर उत्तराखंडच्या पौरी गढवालमध्ये शनिवारी संध्याकाळी भूकंपाचे (Uttarakhand Earthquake) धक्के जाणवले. उत्तराखंडमधील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 5 किमी खाली असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपामुळे जीवित व वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. शनिवारी महाराष्ट्रातील नाशिकमध्येही भूकंपाचे धक्के (Nashik Earthquake) जाणवले. सकाळी 9.38 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ एवढी होती. नाशिकच्या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
दोन दिवसांपूर्वी भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भीषण भूकंप झाला होता. नेपाळ भूकंपाचा केंद्रबिंदू भारताच्या उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनौपासून 266 किमी अंतरावर होता, मात्र त्याचे धक्के राष्ट्रीय राजधानी दिल्लीपर्यंत जाणवले.
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे भूकंप होतात. टेक्टोनिक प्लेट्स नेहमी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली हळू हळू फिरत असतात, परंतु कधीकधी त्यांच्या काठावरचे क्षेत्र अडकते आणि घर्षण तयार होते. या घर्षणातून बाहेर पडणारी ऊर्जा तरंगांच्या रूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते आणि भूकंपाची कंपन आपल्याला जाणवते.
अनेक भूवैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की नेपाळ आणि हिमाचल दरम्यान एक क्षेत्र आहे, जिथे अनेक वर्षांपासून ऊर्जा उत्सर्जित होत नसल्याने कधीही प्राणघातक स्वरूपाचा मोठा भूकंप होऊ शकतो. त्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8 पेक्षा जास्त असू शकते, असे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. एप्रिल 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 तीव्रतेचा भयानक भूकंप झाला होता आणि 9 हजार लोकांचा त्यात बळी गेला होता. अशा परिस्थितीत 8 पेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप खूप विनाशकारी ठरू शकतो.
टीव्ही 9 शी केलेल्या संभाषणात भूगर्भशास्त्रज्ञ अजय पाल यांनी सांगितले होते की, गेल्या 10 वर्षांत भारतातील उत्तराखंडच्या डोंगराळ राज्यात 700 भूकंपांची नोंद झाली आहे. त्यांची तीव्रता 4 पेक्षा कमी असली तरी, येत्या काळात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.