मुंबई : तुम्हाला जर सिगारेटचे व्यसन सोडायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आयआयटी दिल्लीच्या ( DELHI IIT ) माजी विद्यार्थ्याने जगातला पहिला सिगारेट्चे व्यसन सोडायला मदत करणारा अनोखा फिल्टर ( FILTER ) बनवला आहे, या फिल्टरची सध्या खूपच चर्चा होत आहे. हा सिगारेटचा ( Cigarette ) फिल्टर खूपच लाभदायक ठरणार आहे. यामुळे आरोग्याच्या रक्षणाबरोबरच सिगारेटची ही वाईट सवय सुटायला मदत करणार आहे. कशी ते पाहूयात…
तु्म्हाला जर सिगारेटचे व्यसन सोडायचे आहे. परंतू इच्छा असूनही ते सुटत नसेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. दिल्ली आयआयटीचा माजी विद्यार्थी प्रतीक शर्मा याने सिगारेट्स पिणाऱ्यासाठी एक वेगळ्या धाटणीचा सिगारेट्स फिल्टर विकसित केला आहे. दिल्ली आयआयटीतून 2015 साली ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे प्रतिक शर्मा यांनी जगातला पहिला असा फिल्टर तयार केल्याचा दावा केला आहे जो सिगारेटची सवय सोडायला मदत करणार आहे.
या सिगारेट्स फिल्टरचे नाव ‘सिगीबड’ असे ठेवण्यात आले असून बुधवारपासून तो बाजारात उपलब्ध झाला आहे. ‘सिगीबड’ तुमचे सिगारेटचे व्यसन सोडण्यास मदत करणार आहे, तसेच हा फिल्टर तुमच्या सिगारेटसची चव कोणत्याही स्वरूपात न बदलता तुमच्या शरीरात जाणारे 80 टक्के निकोटीन फिल्टर करून रोखणार आहे.
स्टार्टअप नॅशनल अवार्ड
आयआयटीचा अभ्यास करताना प्रतीक शर्माने आपल्या प्रोफेसरांच्या मदतीने नॅनोफायबर टेक्नोलॉजी विकसित करून त्याचे पेटंट घेतले होते. त्यांनी या तंत्रावर आधारीत उत्पादने बनवित त्यांना बाजारात उतरविले होते. शर्मा यांना याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते साल 2017 मध्ये स्टार्टअप नॅशनल अॅवार्ड मिळाले होते.
63 टक्के लोकांना व्यसन सोडायचे असते
प्रतिक शर्मा यांनी म्हटले आहे की नासोफिल्टर, नॅनोक्लीन पॉल्यूशन नेट आणि मासोमास्क आदी उत्पादनांवर काम करताना हे तंत्र आपण धुम्रपान सोडण्यासाठी वापरण्याचे ठरविले. एका सर्वेक्षणात 63 टक्के धुम्रपान करणाऱ्यांना हे व्यसन सोडायचे असते. परंतू निकोटीनच्या नशेमुळे ते असे करू शकत नाही, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते केवळ चार टक्के लोकच हे व्यसन सोडण्यात यशस्वी होतात.
किती आहे किंमत
सिगीबडच्या प्रत्येक पाकिटात 30 फिल्टर असतील, त्याची किंमत 350 रूपये असेल. प्रत्येक फिल्टरचा एकदाच वापर करणे योग्य ठरेल, परंतू तरीही तीन वेळा ते वापरता येईल. त्यानंतर ते बिनउपयोगी ठरेल. सिगारेट बनविणाऱ्यांना कंपन्यांना ते बायो सेफ सिगारेट फिल्टर बनविण्याचे तंत्र देण्यासही ते तयार आहेत. सिगारेटची थोटकं फेकल्याने समुद्राचे प्रदुषण वाढण्याचे एक कारण आहे. आमचे तंत्र बायो-सेफ फिल्टर बनविण्यास मदत करू शकते.