गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या फंक्शन्सना मार्च महिन्यातच सुरूवात झाली. पहिल प्री-वेडिंग फंक्शन हे गुजरातच्या जामनगरमध्ये झालं. त्यानंतर अंबानी कुटुंबाने मे महिन्याच्या अखेरीस एका मोठ्या क्रूझवर पार्टी केली, त्यालाही विविध सेलिब्रिटी उपस्थित होते. तर गेल्या आठवड्यापासून लग्नाची तयारी जल्लोषात सुरू असून संगीत, हळद, मेहंदी असे अनेक समारंभ पार पडले. अखेर आज ( 12 जुलै) अनंत-राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि वीरेन मर्चंट यांच्या मुलीच्या लग्नासाठी जगभरातील महत्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र याच दरम्यान अनंत अंबानी याच्या नावाने होणारा एक घोटाळा ( स्कॅम)समोर आला असून त्यामुळे खळबळ माजली आहे.
या मध्ये, 26 हजार रुपये गुंतवून करोडो रुपये छापल्याची चर्चा आहे. लोक काहीही न करता घरात बसून करोडपती होऊ शकतात, असा दावाही केला जात आहे. खरंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर(ट्विटर) दिग्दर्शक अविनाश दास यांनी अनंत अंबानींच्या नावाने होत असलेल्या या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.
काय म्हणाले अविनाश दास ?
अविनाश दास यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्यांनी म्हटलं की, त्यांना सकाळी कोणीतरी एक लिंक पाठवली आणि त्यावर क्लिक केल्यावर हिंदुस्तान टाइम्सचे पेज उघडलं. या पेजर, CNBC-TV18 चे व्यवस्थापकीय संपादक आनंद नरसिंहन आणि अनंत अंबानी यांच्यातील संभाषणाचा हवाला देण्यात आला असून त्याद्वारे घोटाळा केला आहे.
आनंद नरसिंहन आणि अनंत अंबानी यांच्यातील संभाषण काय ?
एका मुलाखतीत आनंद नरसिंहन यांनी अनंत अंबानी यांना प्रश्न विचारला, ”तुम्ही अनेकदा म्हणता की गरिबी ही माणसाची निवड आहे, पण तुम्हाला हे कसं कळलं? तुमची फी या देशात कोणत्याही व्यक्तीच्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यावर उत्तर देताना अनंत अंबानी म्हणाले की, ” त्यांच्या एका सहाय्यकाने केवळ 26 हजार रुपये गुंतवून करोडो रुपये कमावले आणि आता त्या व्यक्तीकडे आलिशान फ्लॅट आणि महागडी कार आहे. ”
मात्र आनंद यांचा यावर विश्वास बसला नाही, म्हणून अनंत यांनी त्यांचा स्मार्टफोन घेतला, आणि त्यावर BTC MAXIMUM AI ची वेबसाइट उघडली, खाते रजिस्टर केले आणि लगेच 26 हजार रुपये गुंतवले. अर्ध्या तासानंतर ही रक्कम पाच हजार रुपयांनी वाढली होती. म्हणजेच दर तासाला तुमचे पैसे वाढत आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही करोडपती होऊ शकता, असा दावा त्यात करण्यात आला, असे अविनाश दास यांनी नमूद केलं.
सुबह किसी ने मुझे एक लिंक भेजा। खोलने पर हिंदुस्तान टाइम्स का पन्ना खुला। ख़बर थी कि CNBC-TV18 के एक इंटरव्यू में अनंत अंबानी से जब आनंद नरसिम्हन ने ये पूछा कि “आप अक्सर कहते हैं कि गरीबी एक मानव विकल्प है। लेकिन आप यह कैसे जान सकते हैं? आपकी फीस इस देश में किसी की भी तनख्वाह से… pic.twitter.com/eHKuiBPwcV
— Avinash Das (@avinashonly) July 11, 2024
मात्र अनंत अंबानी यांनी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही. घोटाळे करणाऱ्यांनी वेबसाईट क्लोन करून हिंदुस्तान टाईम्स सारखी साईट तयार केली. आणि त्याद्वारे हा स्कॅम करण्यात आल्याचे समोर आले आहे.
ही एक अद्भुत फसवणूक आहे. सकाळपासून हे व्हायरल होत आहे. ही लिंक तुम्हालाही कोणी पाठवली असेल तर कृपया सावध राहा. तुमचे 26 हजार रुपये बुडतील, असा इशाराही दास यांनी दिला.