Andhra Pradesh Violence : कोनासीमा जिल्ह्याच्या नामांतरावरुन आंध्र प्रदेश पेटलं, जमावाने मंत्री, आमदाराचं घर जाळलं! अनेक पोलीस जखमी

| Updated on: May 24, 2022 | 11:37 PM

काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचं नाव कोनासीमा असं करण्यात आलं होतं. आता या जिल्ह्याचं नाव बदलून बी.आर. आंबेडकर असं करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी आंध्र प्रदेशच्या विविध भागात मोठा हिंसाचार सुरु झाला.

Andhra Pradesh Violence : कोनासीमा जिल्ह्याच्या नामांतरावरुन आंध्र प्रदेश पेटलं, जमावाने मंत्री, आमदाराचं घर जाळलं! अनेक पोलीस जखमी
आंध्र प्रदेशात हिंसाचार
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये मंगळवारी मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. कोनासीमा (Konaseema) जिल्ह्याच्या नामकरणावरुन नाराज असलेल्या जमावाने आमदार पोन्नाडा सतीश यांचं घर जाळलं. कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलल्यामुळे लोकांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यातूनच हा हिंसाचार (Violence) भडकल्याचं सांगितलं जातं. जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली, अनेक वाहनं जाळली, इतकंच नाही तर पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचं नाव कोनासीमा असं करण्यात आलं होतं. आता या जिल्ह्याचं नाव बदलून बी.आर. आंबेडकर (B. R. Ambedkar) असं करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी आंध्र प्रदेशच्या विविध भागात मोठा हिंसाचार सुरु झाला.

कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून बी. आर. आंबेडकर करण्यावरुन लोकांमध्ये अशांतता पसरली. त्यांच्या मते जिल्ह्याचं नाव कोनासीमाच असावं. दुसरं कुठलंही नाव या जिल्ह्याला देण्यात येऊ नये. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरुन राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन करत आहेत. नामकरणावरुन नाराज शेकडो लोक अमलापुरम पोहोचले आणि त्यांनी शहरात मोठी हिंसाचार केला. वाहनांची, घरांची जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीमुळे आंध्र प्रदेशात मोठा तणाव पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

हिंसाचारात 20 पोलीस जखमी

मंगळवारी रात्रीपर्यंत आंध्र प्रदेशमधील रस्त्यावर हिंसाचार सुरु होता. आंदोलकांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला चढवण्यात आला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यांच्या अनेक वाहनांना आग लावण्यात आली. जमावाने केलेल्या दगडफेकीत 20 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अनेक लोकांना ताब्यात घेतलं आहे. सध्या अमलापुरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांकडून जमावबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

कोनासीमा साधना समितीकडून मोर्चाचं आयोजन

4 एप्रिल रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यातून कोनासीमा जिल्हा वेगळा करण्यात आला. मागच्या आठवड्यात राज्य सरकारने कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा करण्यासाठी अधिसूचना जारी केली आणि लोकांकडून सूचना मागवली होती. यावर कोनासीमा साधना समितीकडून नामांतराच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. जिल्ह्याचं नाव कोनासीमाच ठेवण्याची मागणी त्यांनी केली. समितीकडून मंगळवारी जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांनी जिल्ह्याचं नाव बदलण्याविरोधात निवेदन देण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं होतं.