नवी दिल्ली : एकीकडे शिवसेना पक्षासाठी आणि चिन्हासाठी लढाई सुरू असतांना ठाकरे गटासमोर आणखी एक मोठं आव्हान निर्माण झाले आहे. निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे. याबाबतची माहीती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. अवघे बारा दिवस उरले असताना, आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसलेला असताना ठाकरे गटापुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. 23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यासाठी पुन्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेकडून निवडणुक आयोगाला विनंती करण्यात आल्याचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले आहे.
2018 मध्ये कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती, मंगळवारी झालेल्या निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान या मुद्यावर निवडणूक आयोगाचा कुठलाच प्रतिसाद मिळाला नव्हता.
14 फेब्रुवारीला शिवसेनेच्या पक्षाबाबत आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे, त्या आधीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे.
याच मुद्द्यावरुन ठाकरे गट चिंतातूर झालेली असतांना शिंदे गटाकडून पक्षप्रमुख पदच घटनाबाह्य असल्याचे म्हंटले होते, त्यावर अनिल देसाई यांनी पलटवार केला आहे.
अनिल देसाई यांनी याबाबत शिंदे गटाला सवालही केला आहे. देसाई म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या सहीनेच तुम्हाला पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. तेव्हा तुम्ही का आक्षेप घेतला नाही.
लोकसभा आणि विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या तेव्हा का? कुणी बोलले नाही. घटणेप्रमाणेच उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख पदावर होते, आता त्यांचा कालावधी संपणार असल्याने संघटनात्मक निवडणुका घेऊ द्याव्यात याबाबत ठाकरे गटाकडून विनंती करण्यात आल्याचे अनिल देसाई म्हणाले आहे.
एकूणच आता देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबाबत काय घडामोडी घडतात याशिवाय पुढच्या सुनावणीत तरी दिलासा मिळणार का याकडे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे.