नवी दिल्ली | 17 March 2024 : आजही अनुराधा पौडवाल यांच्या सदाबहार आवाजाचे गारुड सर्वांवरच आहे. पौडवाल यांनी आत राजकीय सूर आळवले आहे. त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. राजकीय सारीपाटावर त्या कोणता राग छेडतात, याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. त्यांनी भाजपचे महासचिव अरुण सिंह, राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनिल बलूनी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचे प्राथमिक सदस्यता घेतली. भाजप त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत मोठी जबाबदारी सोपवेल अशी आशा आहे. स्टार प्रचारक म्हणून त्या लोकसभेच्या रणधुमाळीत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. सनातन संकल्पनेवर त्यांची दृढ श्रद्धा आहे. अनुराधा पौडवाल लोकप्रियतेच्या शिखरावर असल्या तरी साध्या राहणीमानाने त्यांनी सर्वांचेच मन जिंकले आहे. त्या इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत.
कोकणी कुटुंबात झाला जन्म
अनुराधा पौडवाल यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1954 रोजी कर्नाटकातील उत्तर कन्नडातील कारवारमध्ये एका कोकणी कुटुंबात झाला. त्यांनी त्यांचे पहिले गाणे 1973 मध्ये अभिमान या चित्रपटात गायिले. पौडवाल यांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आवाज दिला. यामध्ये ‘आशिकी’, ‘राम लखन’, ‘साजन’, ‘दिल’, ‘दिल है कि मानता नहीं’ आणि ‘बेटा’ यासारख्या गाजलेल्या सिनेमांचा समावेश आहे. यातील गाणे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती.
किती आहे पौडवाल यांची नेटवर्थ
अनुराधा पौडवाल यांची एकूण संपत्ती किती याचा अचूक अंदाज लावणे अवघड आहे. कारण त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. प्लॅबॅक रॉयल्टी, लाईव्ह शो, रेकॉर्डिंग, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर व्यावसायिक उपक्रमातून त्यांची कमाई होते. काही मीडियाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, त्यांची नेटवर्थ 50 ते 100 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. त्या मुंबईतील खारमध्ये टुमदार घरात राहतात. त्यांना एकदम साधं आयुष्य जगायला आवडते.
पद्मश्री ने गौरव
गायन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. 2017 मध्ये अनुराधा पौडवाल यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय फिल्म फेअर अवॉर्ड, राष्ट्रीय फिल्म पुरस्कारावर पण त्यांच्या नावाची मोहर उमटली आहे. बॉलिवूड चित्रपटातच नाही तर भजनातूनही त्यांनी भाविकांना वेड लावलं आहे. त्यांच्या भजनात भाविक तल्लीन होतात. त्यांच्या सुमधूर आवाजात भक्ती रसाचा वेगळाच गोडवा जाणवतो. त्यांनी करिअरची सुरुवात हिंदी भाषेतून केली असली तरी गुजराती, पहाडी, कन्नड, तामिळ, मराठी, संस्कृत, बंगाली, तेलुगु, उडिया, असमिया, पंजाबीसह अनेक भाषेत त्यांच्या गीतांनी रसिकांचे मन जिंकले आहे.