बैठक घ्या, पण आधी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे कान उपटा; अरविंद सावंत यांचे अमित शाह यांना आवाहन

| Updated on: Dec 14, 2022 | 12:46 PM

दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शाह यांनी एक काम आधी करावं. ते म्हणजे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे कान उपटणे. बसवराज बोम्मई यांना वाह्यात स्टेटमेंट द्यायला मनाई करा. तिथला हिंसाचार बंद करा.

बैठक घ्या, पण आधी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे कान उपटा; अरविंद सावंत यांचे अमित शाह यांना आवाहन
अरविंद सावंत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: सीमावादावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वाद थांबण्याची चिन्हे आहेत. त्यापूर्वीच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते, खासदार अरविंद सावंत यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. अमित शाह यांनी सर्वात आधी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे कान उपटावेत, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केलं आहे.

महाविकास आघाडीच्या खासदारांचं एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटलं होतं. त्यावेळी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शाह यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार शाह यांनी आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे शाह यांचे आभार. आमच्या मागणीनंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आलं आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शाह यांनी एक काम आधी करावं. ते म्हणजे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे कान उपटणे. बसवराज बोम्मई यांना वाह्यात स्टेटमेंट द्यायला मनाई करा. तिथला हिंसाचार बंद करा. जतमध्ये कन्नड रक्षण वेदिका येथे आणि झेंडा फडकवते हे सर्व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचं पुरस्कृत आंदोलन आहे. हे सर्व कर्नाटकाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चाललं आहे. हे लपून राहिलेलं नाही, अशी टीका त्यांनी केली.

केंद्र सरकारची भूमिका न्यायिक राहिली पाहिजे. तराजू झुकता कामा नये, असंही ते म्हणाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फक्त निवडणुकीला बेळगावात जातात. कर्नाटकाच्या भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असं सांगायला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले होते. ते मराठी उमेदवार निवडून आणा असं सांगायला गेले नव्हते, अशी टीका त्यांनी फडणवीस यांचं नाव न घेता केली.

यावेळी त्यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावरही टीका केली. बच्चू कडू हे कडूच आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करता? असा सवाल त्यांनी केला. बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. फेसबुकवरून काहीच होत नसतं, अशी टीका त्यांनी केली होती.

दरम्यान, अमित शाह यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिल्लीत पाचारण केलं आहे. या दोन्ही मुख्यमंत्र्यांशी शाह एकत्र चर्चा करणार की वेगवेगळी चर्चा करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.