मध्य प्रदेश | 23 फेब्रुवारी 2024 : वयात आलेल्या व्यक्तीला मग ती पुरुष असो की महिला वेळीच लग्न व्हावे, संसार थाटावा, संसाराच्या वेलीवर एखादं फुल यावं अशी चारचौघांसारखी इच्छा असते. जर एखाद्याचं लग्नाचं वय उलटले तरी लग्न होत नसेल तर शेजारी पाजारी आणि नातेवाईक टोमणे मारायला लागतात. त्यामुळे लग्नाळु मुला-मुलींची अवस्था वाईट होते. अशा एका मध्य प्रदेशातील दमोह येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा विवाह होत नसल्याने त्याने एक भन्नाट आयडीया केली आणि आता तो रातोरात प्रसिद्ध झाला असून त्याला आता स्थळं देखील येऊ लागली आहेत.
मध्य प्रदेशातील या तरुणाचे नाव दीपेंद्र राठोड याचं देखील लग्न जुळत नव्हतं. दीपेंद्र ई-रिक्षा चालवतो. त्याचं वय वाढले तरी त्याचं लग्न काही केल्याने होत नसल्याने तो नाराज झाला आहे. मग त्याने यावर एक उपाय केला, त्याने आपला परिचय आणि फोटो लिहीलेले मोठे होर्डींग्ड तयार केले. हे होर्डींग त्याने त्यांच्या ई-रिक्षावर लावले आहे. त्याने या होर्डींगवर त्याचे शिक्षण, उंची, रक्त गट लिहीला आहे. आता आपली ई-रिक्षा तो शहरभर फिरवित असल्याने त्याचा आपोआप प्रचार होत आहे.
दीपेंद्र त्याची ई- रिक्षा जेथे घेऊन जातो तेथे त्याच्या होर्डींगवरील सर्व माहीती लोक वाचू लागतात. त्यामुळे शहरात त्याची चर्चा सुरु आहे. आपण 30 वर्षांचे झालो तर आपल्या कोणतेही स्थळ आलेले नाही. आपलेही लग्न व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण हा पर्याय निवडल्याचे त्याचे म्हणणे आहे. दीपेंद्र याने होर्डींगवर एक खास बाब लिहीली आहे, त्याने विवाहासाठी हवी असलेली वधू कोणत्याही जातीची किंवा धर्माची असली तरी आपली काही हरकत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. दीपेंद्र याच्या मते त्यांच्या नातेवाईकांनी त्याच्या लग्नासाठी अनेकदा बोलणी करुन पाहीली तरी काही उपयोग झाला नाही. दर वेळी काही ना काही कारणाने त्याचा भ्रमनिरास व्हायचा. लग्न न झाल्याने लोक त्याला टोमणे मारु लागले, अखेर त्याने हा उपाय योजला. त्याने सरळ आपल्या रिक्षावरच आपला बायोडाटा लावून टाकला. आता त्याला स्थळ येत आहेत. लवकरच त्याचे लग्न होईल अशी त्याला आशा वाटत आहे.