मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि त्यांच्या समर्थकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दिल्लीपासून राजस्थानपर्यंतच्या काँग्रेस (Rajasthan Congress) नेत्यांना जेरीस आणलंय. मात्र ही स्थिती पुढील काही काळ अशीच राहिल का त्यावर काही तोडगा काढला जाईल, यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. एवढे दिवस अडून बसलेले अशोक गहलोत काहीसे नरमलेले दिसत आहेत. सोनिया गांधींची (Sonia Gandhi) भेट घेण्यासाठी ते रात्रीच दिल्लीत पोहोचले आहेत.
अशोक गहलोत नरमलेत, असं म्हटलं जातंय, कारण काल रात्री त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पक्षनेत्या सोनिया गांधी यांची स्तुती केली.
मी सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी जातोय. आमच्या मनात जो नंबर वन असतो, त्याचंच नेतृत्व आम्ही मानतो. त्यामुळे सोनिया गांधींच्या नेतृत्वातच आम्ही भविष्यात काम करणार आहोत. हीच काँग्रेसची शिस्त आहे, असं वक्तव्य अशोक गहलोत यांनी केलं.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आल्यानंतर राजस्थानमध्ये घडलेलं राजकीय नाट्य यावर गहलोत यांनी सहज प्रतिक्रिया दिली. हा आमच्या घरातला वाद आहे. अंतर्गत राजकारणात हे चालतच असतं.
“Internal politics goes on, we will resolve it”: Ashok Gehlot on Rajasthan crisis
Read @ANI Story | https://t.co/gOtjnlyQfS#AshokGehlot #RajasthanPolitics #RajasthanCM #Congress pic.twitter.com/6ztoNMEU7R
— ANI Digital (@ani_digital) September 28, 2022
राजस्थानमध्ये सुरु असलेल्या नाट्याचा परिणाम काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर झालाय. या स्पर्धेत कोण अग्रेसर आहे, यावर अजूनही सस्पेंस कायम आहे.
मात्र, आज सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अशोक गहलोत हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवतील की नाही, यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतरच्या पर्यायांनुसार चित्र स्पष्ट होऊ शकते.
अशोक गहलोत जयपूरमधूल विशेष विमानाने काल रात्री ९.३० च्या सुमारास दिल्लीला पोहोचले. तत्पूर्वी त्यांनी राजस्थानमधील काही मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री निवासस्थानी घेतली.
दरम्यान या सगळ्या गदारोळात अत्यंत संयमी भूमिका घेणाऱ्या सचिन पायलट गटासाठी हा आत्मविश्वास वाढवणारा काळ असल्याचं म्हटलं जातंय. हा घटनाक्रम त्यांच्यासाठी संजीवनी देणारा ठरतोय. तर गहलोत यांच्यासाठी ही खेळी आत्मघातकी ठरू सकते.