पिक्चर बघताना उंदीर चावला, म्हणून थिएटर मालकाला द्यावी लागणार 67 हजार रुपयांची नुकसानभरपाई

| Updated on: May 04, 2023 | 4:11 PM

आसाममधील एका ग्राहक न्यायालयाने नुकतेच एका सिनेमागृहाच्या मालकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. स्क्रिनिंगदरम्यान उंदीर चावल्यामुळे कोर्टाने सिनेमा हॉलच्या मालकाला हे निर्देश दिले.

पिक्चर बघताना उंदीर चावला, म्हणून थिएटर मालकाला द्यावी लागणार 67 हजार रुपयांची नुकसानभरपाई
Image Credit source: tv9
Follow us on

गुवाहाटी : आसाममधील एका ग्राहक न्यायालयाने (Consumer Court) नुकतेच एका सिनेमागृहाच्या मालकाला एका व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. स्क्रिनिंगदरम्यान त्या व्यक्तीला उंदीर (bitten by rat) चावल्यामुळे कोर्टाने सिनेमा हॉलच्या मालकाला हे निर्देश दिले. स्वच्छता राखणे हे सिनेमा हॉलच्या मालकाचे कर्तव्य आहे, असे अध्यक्ष एएफए बोरा आणि सदस्य अर्चना डेका लाखर आणि तुतुमोनी देवा गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील कामरूप जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या खंडपीठाने सांगितले. तक्रारकर्त्याच्या साक्षीनुसार, थिएटरमध्ये पॉपकॉर्न आणि इतर खाद्यपदार्थ, अनेक वस्तू जमिनीवर पडल्या होत्या, त्यामुळे उंदीर फिरत होते.

कोर्टाने 25 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात असे नमूद केले की, तक्रारदाराच्या साक्षीवरून असे दिसून येते की प्रत्येक शोनंतर सिनेमा हॉल नियमितपणे साफ केला जात नाही. आणि सिनेमा हॉलची सुरक्षा आणि स्वच्छताविषयक स्थिती सुनिश्चित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.

पाच वर्षांपूर्वी घडली घटना

ही घटना 20 ऑक्टोबर 2018 रोजी गुवाहाटी येथील भानगढ येथील गॅलेरिया थिएटरमध्ये घडली. ग्राहक मंचासमोरील तक्रार पाच महिन्यांनी स्वीकारण्यात आली. फिर्यादीने आरोप केला आहे की, चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान त्यांच्या पायाला रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याला दोन तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले, कारण त्यावेळी त्याला कोणी चावले हे कळले नव्हते. यानंतर त्या तक्रारदार महिलेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

6 लाख रुपयांची मागितली होती नुकसानभरपाई

या महिलेने सिनेमा हॉलच्या मालकाकडे 6 लाख रुपयांची भरपाई मागितली होती. ही तक्रार योग्य नसल्याचा युक्तिवाद चित्रपटगृहाच्या मालकाने केला होता आणि त्यावेळी महिलेवर उपचारही करण्यात आल्याचे, थिएटर मालकाचे म्हणणे होते. याला विरोध करत महिलेने सांगितले की, जेव्हा ती सिनेमा हॉलच्या मालकाकडे गेली तेव्हा त्याने तिला तिच्या पुढच्या सिनेमासाठी मोफत तिकीट देऊ केले.

या घटनेत सिनेमागृहाचा निष्काळजीपणा असल्याचे न्यायालयाने या प्रकरणी म्हटले आहे. तसेच 67,000 रुपयांची नुकसान भरपाई 45 दिवसांत देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने सांगितले की, जर 45 दिवसांनंतर पैसे भरले गेले तर, रक्कम भरेपर्यंत वार्षिक 12 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.