ब्रह्मपुत्राने नावच घेतली कवेत, 100 जणांना जलसमाधी?

| Updated on: Sep 29, 2022 | 2:55 PM

आसाममधील धुबरी जिल्ह्यामध्ये 100 जणांना घेऊन जाणारी बोट बुडाली असून त्यातील 15 जणांना वाचवण्यात यश आले असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.

ब्रह्मपुत्राने नावच घेतली कवेत, 100 जणांना जलसमाधी?
Follow us on

गुवाहाटीः आसाममध्ये आज ब्रह्मपुत्रा नदीत (Brahmaputra river) बोट बुडून अनेक जणांना जलसमाधी मिळाली असल्याची धक्कादाय घटना घडली आहे. अजूनही बुडालेल्या नागरिकांचा आकडा समजू शकला नाही. आसाममधील (Assam) धुबरी जिल्ह्यामध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. जी बोट बुडाली (boat sank) आहे, त्यामध्ये सुमारे शंभर प्रवासी प्रवास करत होते असं सांगण्यात येत आहे. या बोटीमध्ये 10 मोटारसायकलीही होत्या, असा स्थानिकांचा दावा आहे. बोटीतील एक सरकारी अधिकारी आणि शालेय विद्यार्थी आणि इतर अनेक जण बेपत्ता असल्याचे नागरिकांनी सांगितले.

ही बोट भाशनीकडे जात असताना धुबरीपासून तीन किलोमीटर अंतरावर असतानाच अदबारी येथील पुलाच्या खांबाला धडकली आणि बोट उलटली असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत 15 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली आहे.

या बोटीतून अनेक शाळकरी मुलेही प्रवास करत होती, आणि अद्याप कोणाचाही शोध लागलेला नाही. धुबरी सर्कल ऑफिसर संजू दास, आणि इतर अधिकारी आणि कार्यालयातील कर्मचारीदेखील बोटीतून जात होते.

हे अधिकारी आणि कर्मचारी एका भागाचे सर्वेक्षण करण्यासाठी जात होते. बोटीचा धडक पुलाला बसल्या बसल्या काही जणांनी पोहत किनारी येण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये दोन व्यक्ती पोहून सुखरूप बाहेर आले.

स्थानिकांनी त्यांच्या बोटीतून बचावकार्य केले. गुवाहाटीतील आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जलतरणपटूंचीही यासाठी मदत घेतली जात आहे.

आसामचे कॅबिनेट मंत्री अशोक सिंघल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली असून या दुर्घटनेमुळे मला दुःख झाल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बोटीत बसलेल्या 50 हून अधिक प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

धुबरी-फुलबारी पुलाजवळ एक छोटा कालवा आहे, त्या कालव्यातून अधिकारी आणि कर्मचारी लाकडी बोटीतून जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. धुबरीचे उपायुक्त अनबामुथन यांनी सांगितले की, काही लोकांना पोहता येत होते ते पोहून बाहेर आले.

ही बोटीचा अपघात झाल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि सीमा सुरक्षा दलाची पथकांनी शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. बेपत्ता झालेल्या सात जणांमध्ये सर्कल ऑफिसर संजू दास यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रह्मपुत्रा नदीतील बांधकाम सुरू असलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी जात होते. मग नदीतील जलपर्णीत अडकून बोट उलटल्याची चर्चा समोर येत असून त्यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

बोटीतून प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचप्रकारे काही दिवसांपूर्वी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीतही एक बोट उलटली होती. त्यामध्ये तीन सैनिक होते. त्यातील दोन जवान पोहत बाहेर आले तर एक जण बेपत्ता झाला होता.