राहुल गांधींनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथे काय झालं?; हरियाणात मतमोजणीचे राऊंड झाले 12, पण दाखवले…

| Updated on: Oct 08, 2024 | 3:01 PM

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोठा ट्विस्ट आला आहे. आधी आघाडीवर असलेली काँग्रेस अचानक पिछाडीवर आली आहे. तर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र या सर्व प्रकाराला काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच हा सर्व माइंड गेम सुरू आहे. त्यामुळे निराश होऊ नका, असं आवाहन काँग्रेसने कार्यकर्त्यांना केलं आहे.

राहुल गांधींनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथे काय झालं?; हरियाणात मतमोजणीचे राऊंड झाले 12, पण दाखवले...
राहुल गांधी
Image Credit source: PTI
Follow us on

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात अचानक मोठा ट्विस्ट आला आहे. सकाळच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर होती. नुसतीच आघाडीवर नव्हती तर बहुमताच्याही पुढे गेली होती. पण त्यानंतर झालेल्या राऊंडनंतर काँग्रेस गडगडली. भाजप पुढे सरकली. सध्याच्या कलानुसार भाजप 50 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 35 जागांवर पुढे आहे. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्यात कांटे की टक्कर सुरू आहे.

निवडणूक कलांमध्ये अत्यंत रोचक आकडे समोर आले आहेत. भाजपसाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प कार्ड ठरले आहेत. तर राहुल गांधी यांना मात्र काँग्रेससाठी कोणताही करिश्मा घडवून आणता आलेला नाही. हरियाणा निवडणुकीत मोदींनी पाच निवडणूक रॅली केल्या होत्या. या रॅलींचा परिणाम हरियाणातील 17 विधानसभा मतदारसंघांवर पडला आहे. यापैकी 10 मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस पाच आणि इतर दोन जागांवर आघाडीवर आहे. तर राहुल गांधी यांनीही हरियाणात 14 सभा घेतल्या होत्या. त्या 14 जागांपैकी 7 जागांवर काँग्रेस पिछाडीवर आहे. तर केवळ चार जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर तीन जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

भाजपकडून हल्लाबोल

निवडणूक निकालाचे कल फिरताच भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. हरियाणात लोकशाहीचा विजय झाला आहे. जे रॉकेट लॉन्च होत नाही, त्याला मिळालेलं हे उत्तर आहे. भारतातून लोकशाही संपल्याची आवई उठवली जाते, त्याला हे उत्तर आहे. जिलेबी फॅक्ट्रीत बनत नाही, मेहनती हलवाईच्या दुकानातच जिलेबी बनते, हे हरियाणाने दाखवून दिलं आहे. सध्या जे कल आहेत, ते निकालात परिवर्तित होतील याची आम्ही वाट पाहतोय. तिसऱ्यांदा भाजप जिंकत आहे. आणि काँग्रेस हिट विकेट होत आहे, असंही गौरव भाटिया यांनी सांगितलं.

हा माइंड गेम…

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निकालावर आक्षेप घेतला आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोग आमच्या प्रश्नांची उत्तरे देतील अशी आशा आहे. कारण आता मतमोजणीच्या 11 ते 12 राऊंडचे निकाल आले आहेत. पण त्यापैकी केवळ 4 ते 5 राऊंडचे निकालच अपडेट करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीतही असंच झालं होतं. त्यामुळे निवडणूक आयोग या गोष्टीकडे लक्ष देईल असं वाटतं. त्यांनी प्रशासनावर दबाव टाकावा, असं सांगतानाच कार्यकर्त्यांनी हताश होऊ नका, निराश होऊ नका. हा सर्व माइंड गेम सुरू आहे. आपल्याला जनमताचा कौल मिळणार आहे. काँग्रेसचंच सरकार बनणार आहे, असं जयराम रमेश यांनी सांगितलं.