अयोध्येसाठी देशाच्या प्रत्येक झोनमधून धावणार ‘आस्था स्पेशल’ ट्रेन, पाहा रेल्वे मंत्रालयाची योजना

| Updated on: Jan 07, 2024 | 6:12 PM

अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण येत्या 22 जानेवारीला होत आहे. या राममंदिराच्या दर्शनासाठी भाविक आतूर झाले असताना आता भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे प्रत्येक झोनमधून अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन चालविणार आहे.

अयोध्येसाठी देशाच्या प्रत्येक झोनमधून धावणार आस्था स्पेशल ट्रेन, पाहा रेल्वे मंत्रालयाची योजना
astha special train
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 7 जानेवारी 2024 : अयोध्येत येत्या 22 जानेवारी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा समारंभामुळे देशभर उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातून राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार असल्याने आता रेल्वे मंत्रालय देखील कामाला लागले आहे. अयोध्या धाम स्थानकात देशभरातील रामभक्तांना पोहचता यावे यासाठी रेल्वेने सर्व रेल्वे झोनमधून अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन चालविण्याची योजना आखली आहे. सर्व झोनल रेल्वेला रेल्वे बोर्डाने स्पेशल ट्रेनच्या संचालना संदर्भातील माहीती दिली आहे. या ट्रेनचे नाव आस्था स्पेशल ट्रेन असे ठेवण्यात आले आहे.

अयोध्येत येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठा समारंभाच्या पार्श्वभूमीवर आता रामभक्ताच्या सोयीसाठी आस्था स्पेशल ट्रेनचा संचलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक विभागाने दिलेल्या मंजूरीनंतर रेल्वे बोर्डाने स्पेशल ट्रेन चालविण्याची माहीती देशातील सर्व झोनल रेल्वेला दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने आस्था स्पेशल ट्रेन चालविण्याची जबाबदारी इंडियन रेल्वे कॅटरिंग एंड टुरिझम कॉर्पोरेशन ( आयआरसीटीसी ) वर सोपविली आहे. पूर्व मध्य रेल्वेसह देशातील सर्व रेल्वे झोनलच्या प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक, प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक आणि सर्व रेल्वे झोनलना रेल्वे बोर्डाच्या पॅसेंजर मार्केटींग डायरेक्टर विपुल सिंघल यांनी पत्र पाठवून ही विनंती केली. या पत्रात आस्था स्पेशल ट्रेन ज्या रेल्वे झोनमधून जाईल, त्याची मॉनिटरिंग नजिकच्या झोनल रेल्वेचे अधिकारी करतील असे या पत्रात म्हटले आहे.

आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्यांना सवलत

या आस्था स्पेशल ट्रेनची तिकीटे थेट आयआरसीटीसीद्वारा जारी केली जातील. त्याची बुकींग आयआरसीटीसीच्या टुरिस्ट पोर्टलच्या मार्फत केली जाईल. ट्रेनची प्रोफाईल पीआरएस डेटाबेसमध्ये दिसणार नाही. या बुकिंगसाठी प्रवाशांच्या माहीतीसह त्यांच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक आपातकालिन संपर्कासाठी द्यावा लागेल. आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्यांसाठी आस्था स्पेशल ट्रेनमध्ये आसने आरक्षित ठेवली जातील. दर तीन कोचनंतर सहा फ्री बर्थची सुविधा दिली जाईल. आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्यांसाठी या ट्रेनमध्ये खानपान आणि वितरण तसेच परिवहनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.