नवी दिल्ली | अनोळखी व्यक्तीबद्दल सविस्तर माहिती सांगणे तसेच समोरील व्यक्तीच्या मनातलं ओळखण्याची शक्ती असल्याचा दावा करणारे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar baba). नेहमीच कोणत्या ना कोणत्या दाव्यांनी चर्चेत राहणाऱ्या या धीरेंद्र शास्त्रींनी नुकतीच एका टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सांगितलेला किस्सा सध्या जोरदार चर्चेत आहे. धीरेंद्र शास्त्री लहान असताना मथुरा वृंदावनाची परिक्रमा करण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांचं कुणीतरी पाकिट मारलं. त्यामुळे त्यांना बिना तिकिटाचा प्रवास करावा लागला होता. बिना तिकिटाचे ते थेट एसीच्या डब्यात बसले. पण टीटीईने पकडताच मोठा चमत्कार घडल्याचा दावा धीरेंद्र शास्त्री यांनी केला आहे.
धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलं, मथुरेहून परतीच्या प्रवासात त्यांच्या खिसात १३०० रुपये आणि एक मोबाइल फोन होता. पण मथुरा जंक्शनवर त्यांसा पाकिटमारांनी कापला. त्यामुळे तिकिट खरेदीलाही पैसे नव्हते. सोबत असलेल्या बजरंगबलीची मूर्ती दाखवत त्यांनी एकाला मदत मागितली. रात्री एका एक्सप्रेस ट्रेनच्या एसी डब्यात चढले. डब्यात सगळ्याच जागा फुल्ल होत्या. त्यामुळे ते वॉश बेसिनजवळ उभे राहिले. तिथेच उभे राहून प्रवास करू लागले. एवढ्यात टीटीई आले. त्यांनी तिकिट मागितले. धीरेंद्र शास्त्री म्हणाले, माझ्याकडे तिकिट असते तर मी इ्थे उभा राहिलो असतो का?
टीटीईंना वाटलं मी लहान मुलगा आहे. त्यांनी मला पुढच्या स्टेशनवर खाली उतरून जायला सांगितलं. धीरेंद्र शास्त्री म्हणाले, जनरल डब्यात जायचं असतं तर एसी डब्यात कशाला आलो असतो? त्यानंतर टीटीईने त्यांना दंड भरा किंवा जेलमध्ये जा, असा इशारा दिला. धीरेंद्र शास्त्रींनी स्वतःच पुढचा चमत्कार सांगितला… ते म्हणाले, मी तत्काळ बजरंगबलीची मदत मागितली. टीटीईचं नाव, वडिलांचं नाव, पत्नीचं नाव सांगितलं. त्यांना अपत्य नसल्याचंही सांगितलं. ते ऐकून टीटीई अवाक् झाला. धीरेंद्र शास्त्रींना स्वतःच्या सीटवर जागा दिली. त्यांच्यासमोर हात जोडून बसले. टीटीईंनी त्यांना कॉफी दिली. सकाळी ट्रेनमधून उतरताना ११०० रुपये दक्षिणाही दिली. त्यानंतर धीरेंद्र शास्त्रींचा पुढचा प्रवास सुखरुप झाला, असा किस्सा त्यांनी सांगितला.
धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलेला हा नवा किस्सा सध्या जोरदार चर्चेत आहे. समोरील व्यक्तीची संपूर्ण माहिती सांगण्याची शक्ती आपल्याकडे आहे, असा दावा धीरेंद्र शास्त्री करत असतात. ही एक मानसिक शक्ती असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सखोल अभ्यास आणि साधनेद्वारे ही शक्ती प्राप्त करता येऊ शकते, असे दावेही अनेक तज्ज्ञ करतात. मध्य प्रदेशसातील छत्तरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्रींनादेखील हीच शक्ती अवगत असल्याचे म्हटले जाते. आपल्या या चमत्कारांचे किस्से ते नेहमीच कार्यक्रमांतून ऐकवत असतात. त्यापैकी हा नवा किस्सा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.