नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातल्या बागेश्वरधाम येथे अन्नपूर्णा महायज्ञाचा समारोप झाला. यावेळी पीठाधीश्वर धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नेतृत्वात ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे २२० जण हिंदू धर्मात परतले. शास्त्री यांनी सर्वांना पिवळी पट्टी परिधान करायला दिली. बागेश्वरधाममध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांची घरवापसी झाली. बागेश्वरधामचे पीठाधीश्वर धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या उपस्थितीत २२० जणांनी पिवळी पट्टी परिधान करून हिंदू धर्मात प्रवेश केला. शास्त्री यांनी म्हटलं की, या लोकांनी स्वतःहून हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा व्यक्त केली. हिंदू जागरण मंचाच्या लोकांनी त्यांना बागेश्वरधाम येथे आणले.
टपरीयन, बनापूर, चितौरा आणि बम्हौरीसह दुसऱ्या गावांतील काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे रविवारी त्यांना छतरपूर जिल्ह्यातील गढा गावातील बागेश्वरधाम येथे आणण्यात आले. हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की, यातील काही लोकं मिशनऱ्यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून चर्चमध्ये जाणे सुरू केले होते.
ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात परत आलेल्या व्यक्तीने सांगितले की, त्यांना मिशनऱ्यांनी प्रलोभन दाखवून ख्रिश्चन धर्मात प्रवेश करायला लावला होता. मिशनऱ्यांनी त्यांना घर देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे ते हिंदू धर्मात स्वतःच्या मर्जीने परतले.
पंडित धिरेंद्र कृष्ण कुमार यावेळी म्हणाले, चूक कुणाकडूनही होऊ शकते. तुम्ही शनिवार आणि मंगळवारी हनुमान मंदिरात जाणे सुरू करा. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण, हिंदू धर्माचे कट्ट्रर अनुयायी आहोत. मला लोकप्रियता नको. रामचरितमानसला राष्ट्रीय ग्रंथ आणि भारताला हिंदू राष्ट्र म्हणून बघायचे आहे. आशीर्वादाशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाने आमच्याकडून अपेक्षा करू नये, असंही त्यांनी म्हंटलं.
हिंदू जागरण मंचानं पुढाकार घेतला. लोकांनी स्वतः इच्छा व्यक्त केली. त्यामुळे हिंदू धर्मात परत येण्यासाठी दोनशेच्यावर लोकं तयार झाले. बागेश्वरधाम येथे येऊन त्यांनी धिरेंद्र कृष्ण कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. हिंदू धर्मात प्रवेश करून घेतला. यावेळी त्यांनी काही महत्वाची माहिती दिली.