डोकंच उडवू, बागेश्वर बाबाला धमकी, हिंदू संघटना भडकल्या

| Updated on: Apr 10, 2024 | 11:42 AM

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे उघड झाले आहे. फेसबूक या सोशल मीडियाच्या माध्यमातून बागेश्वर बाबांना ही धमकी देण्यात आली. त्यानंतर हिंदू संघटनांचे कार्यकर्ते संतापले असून ते आक्रमक झाले आहेत.

डोकंच उडवू, बागेश्वर बाबाला धमकी, हिंदू संघटना भडकल्या
Follow us on

उत्तर प्रदेशातील बरेली येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बरेच लोकप्रिय आहेत. या बागेश्वर बाबांच्या संदर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांना जीवानिशी मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबूकच्या माध्यमातून त्यांना ही धमकी देण्यात आली असून तुमचं शीर धडावेगळं करू, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र या धमकीमुळे हिंदू संघटनांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी बरेलीच्या आमला कोतवालीमध्ये तक्रार नोंदवत एक पत्रही दिले आहे.

सनातन धर्मगुरू पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा फोटो असभ्य रीतीने संपादित करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असून, त्यात त्यांच्या शिरच्छेदाच्या ऑडिओचाही समावेश आहे, असे त्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान या व्हिडिओमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजातील संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे हिंदू संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आमला पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ घातला. पोलिस अधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान धमकावल्याच्या आरोपावरून फैज रझा नावाच्या व्यक्तीविरुद्ध कलम ५०५ (२) अन्वये कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच याप्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. घटनास्थळी शांततापूर्ण वातावरण आहे. फैज रझा यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे आणि त्यांचा शिरच्छेद करण्याबाबत तसेच अयोग्य शब्द लिहीत स्टेटस पोस्ट केले, असे हिंदू संघटनेच्या एका नेत्याने सांगितले.त्यात सर तन से जुडा या गाण्याचाही समावेश आहे. त्याच्या पोस्टवर इतरही काही लोकांनी असभ्य कमेंट केल्या आहेत. या सर्व कारवायांमुळे वातावरण बिघडू शकते, त्यामुळे आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याआधीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना धमक्या आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.