केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) भारतातील सर्वात कठीण परीक्षा आणि मुलाखती घेते. वर्षानुवर्षे, लाखो इच्छुक कित्येक वर्षांच्या मेहनतीनंतर परीक्षा देतात परंतु शेवटी, मोजकेच निवडले जातात. कठोर परिश्रम, मार्गदर्शन आणि दृढता (Guidance and perseverance) यांचा योग्य मिलाफच UPSC इच्छुकांना IAS परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करू शकतो. युपीएससीमध्ये पहिल्या प्रयत्नात यश मिळविणारे तसे कमीच असतात. परंतु, २०१६ च्या बॅचमधील आणि देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी (The youngest IAS officer in the country) म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी अन्सार शेख यांची कहाणी सर्वांना प्रेरणा देणारी ठरत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील ऑटोरिक्षा चालक (Autorickshaw driver) योनस शेख अहमद यांच्या घरी अन्सार यांचा जन्म झाला. अन्सार शेखचे वडील दारूच्या व्यसनात बुडाले होते. त्यांनी तीन लग्न केले होते. अन्सारची आई त्यांची दुसरी पत्नी आहेत. त्यांनी शेतमजुरी करीत अन्सार यांना मोठे केले.
अन्सार शेख कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाह जवळून पाहत मोठा झाला. त्याच्या बहिणींची लग्ने 15 व्या वर्षीच झाली होती, आणि त्याचा धाकटा भाऊ, अनीसने इयत्ता 7 वी मध्ये शाळा सोडली आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि अन्सारला IAS परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत करण्यासाठी गॅरेजमध्ये काम केले.
UPSC परीक्षा उत्तम निकालासह उत्तीर्ण केल्यानंतर, 21 वर्षीय तरुणाने ऑल इंडिया रँकमध्ये स्थान मिळवले आणि या वयात तो सर्वात तरुण आयएएस अधिकारी बनला. अन्सार शेख यांचे बालपण एखाद्या लढाईपेक्षा कमी नव्हते. सर्व संकटांशी झुंज देत अन्सारने आपले ध्येय कधीही सोडले नाही. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास इच्छुक नसलेल्या अन्सारने एक नवीन मार्ग स्वीकारला ज्याने आज एक इतिहास घडवला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अन्सारने नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज केला आणि तेथे त्याने 275 पैकी 199 गुण मिळवले. अन्सारने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे.
अन्सार अहमद शेख आयएएस आपल्या यशाबद्दल म्हणाले, “कष्टाला पर्याय नाही. माझ्या संघर्षादरम्यान, माझ्या मित्रांनी मला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप मदत केली आणि माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे माझ्या कोचिंग अकादमीनेही फीचा काही भाग माफ केला. अन्सार शेखने एकदा आयएएस उमेदवारांना दिलेल्या संदेशात म्हटले होते, “तुम्हाला वाटत असेल की तुमची स्पर्धा परीक्षा देणार्या लाखो उमेदवारांशी, तर तुम्ही चुकत आहात. तुमची स्पर्धा फक्त तुमच्याशीच आहे. त्यामुळे तुमच्या सर्व निराशावादी विचारांपासून मुक्त व्हा म्हणजे यश तुमच्या वाट्याला येईल. बरेच लोक गरीब असल्याचे कारण देऊन अभ्यास करणे टाळतात. पण लक्षात ठेवा गरिबी आणि यश या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. तुम्ही मेहनती आणि तुमच्या ध्येयाकडे दृढनिश्चय असले पाहिजे. तुमची पार्श्वभूमी महत्त्वाची नाही.