उत्तर प्रदेश | 18 जानेवारी 2024 : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा आणि अभिषेक सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सुमारे सहा हजार लोक सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे 11 दिवसांच्या विधीनुसार यम नियमांचे पालन करत आहेत. राम लल्लाच्या अभिषेकपूर्वी पंतप्रधान मोदी सध्या जमिनीवर झोपत आहेत. फक्त एक ब्लँकेट वापरत आहेत. तसेच फक्त नारळ पाणी पीत आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीही पंतप्रधान उपवास करणार आहेत.
प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधान मोदी उपवास करणार आहेत. यावेळी ते विशिष्ट मंत्रांचा जप करतील. 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मुख्य यजमानपद भूषविणार आहेत. 16 जानेवारीपासून राम मंदिराशी संबंधित धार्मिक विधी सुरू झाले आहेत. हे विधी 21 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रम 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1 वाजता संपेल.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या अनेक दिवसांत देशभरातील विविध मंदिरांमध्ये प्रार्थना केल्या. महाराष्ट्रातील काळाराम मंदिरालाही त्यांनी भेट दिली. नंतर रामकुंड गाठले. 16 जानेवारीला त्यांनी आंध्र प्रदेशातील वीरभद्र मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांनी जटायूशी संबंधित कथा ऐकली. काल त्यांनी केरळमधील श्री रामास्वामी मंदिराला भेट देऊन प्रभूची पूजा केली.
दरम्यान, 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेकपूर्वी बुधवारी रात्री रामललाची मूर्ती अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली. मूर्ती आत आणण्यापूर्वी गर्भगृहात विशेष पूजा करण्यात आली. ही मूर्ती एका ट्रकमधून मंदिरात आणण्यात आली. या काळात संपूर्ण मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक विधी केले जात आहेत. बुधवारी कलश पूजनाच विधी संपन्न झाला. राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारीपर्यंत हे विधी सुरू राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक विधी पार पाडले जातील. 121 ‘आचार्य’ हे विधी करत आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.