जयपूर | 30 डिसेंबर 2023 : राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापनेच्या २७ दिवसांनंतर भजनलाल शर्मा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शर्मा सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात एकूण 22 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यातील 12 जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र यात चर्चेत राहिले ते राज्य मंत्री सुरेंद्रपाल सिंह टीटी. भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एक म्हणून सुरेंद्र पाल सिंग टीटी ओळखले जातात. भजनलाल शर्मा सरकारमध्ये राज्यमंत्री होण्यापूर्वी ते वसुंधरा राजे सिंधिया सरकारमध्ये कृषी मंत्री होते. मात्र, त्यांनी घेतलेल्या शपथेवरून काँग्रेसने प्रश्न उपस्थित केलेत. तसेच, देशातील हे पहिलेच प्रकरण असल्याचा दावा काँग्रेसने केला ते प्रकरण नेमके आहे तरी काय?
सुरेंद्रपाल सिंग टीटी हे भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. भजनलाल शर्मा सरकारमध्ये राज्यमंत्री होण्यापूर्वी ते वसुंधरा राजे सिंधिया सरकारमध्ये कृषी मंत्री होते. यानंतर त्यांच्याकडे खाण आणि पेट्रोलियम ही खाती आली. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत करणपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या गुरमीत सिंग कुनर यांनी त्यांचा पराभव केला होता.
राजस्थानमधील 200 विधानसभा जागांपैकी केवळ 199 जागांवरच निवडणुका झाल्या. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार गुरमीत सिंह कुन्नर यांचे निवडणूक काळात निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणुक पुढे ढकलण्यात आली होती. करणपूर जागेसाठी 5 जानेवारी 2024 रोजी पोटनिवडणूक होत आहे. तर, निवडणुकीचा निकाल 8 जानेवारीला लागणार आहे.
करणपूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने सुरेंद्रपाल सिंह टीटी यांना उमेदवारी दिली आहे. त्याची लढत कॉंग्रेस उमेदवार विरोधात होणार आहे. निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच सुरेंद्रपाल सिंह टीटी यांनी जयपूर गाठले आणि भजनलाल शर्मा सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
श्रीकरणपूर विधानसभा जागेसाठी 5 जानेवारीला मतदान होणार आहे. पण, निवडणुक होण्यापूर्वीच भाजपने मोठा डाव खेळला आहे. श्रीकरणपूरमध्ये येत्या 5 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. मंत्री सुरेंद्रपाल सिंह टीटी यांनी यावर बोलताना भाजपने त्यांना मंत्री करून करनपूरच्या मतदारांचा सन्मान केला आहे अशी प्रतिक्रिया दिली.
भाजपच्या या पावलावर राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी भाजपचा अहंकार क्लाउड नाइनवर आहे. निवडणूक आयोगाची अवहेलना करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून भाजप उमेदवार सुरेंद्रपाल टीटी यांना मंत्री म्हणून शपथ दिली. निवडणुकीपूर्वी आपल्या उमेदवाराला मंत्री बनवण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून कारवाईची मागणी करणार आहे असे त्यांनी सांगितले. भाजप मतदारांना भुरळ घालू शकेल पण काँग्रेस पक्ष श्रीकरणपूरची जागा मोठ्या फरकाने जिंकेल असा दावाही गोविंद सिंह दोतासरा यांनी केला.