बंगळुरु | 26 ऑगस्ट 2023 : 23 ऑगस्टला संपूर्ण भारत देशासाठी अभिमानाचा दिवस होता. कारण चांद्रयान 3 चं विक्रम लँडर चंद्रावर लँड झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आफ्रिकेत होते. तिथून मोदींनी देशाला संबोधित केलं. पुढे ते ग्रीसमध्येही गेले. हा दौरा आटोपून परत आल्यानंतर मोदी आज इस्रोचं मुख्यालय असणाऱ्या बंगळुरुत दाखल झाले. तिथे जात मोदींनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांना संबोधित केलं. यावेळी विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाला शिवशक्ती म्हणून संबोधलं जाणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. चांद्रयान 3 या मिशनने चंद्राचं रहस्य उलगडेल. सोबतच पृथ्वीवरील समस्यांचंही निराकरण केलं जाईल. चंद्राच्या ज्या भागावर आपलं चंद्रयान उतरलं. त्या स्थानाला नाव देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. ज्या स्थानावर चंद्रयान -3चं विक्रम लँडर उतरलं त्या ठिकाणाला इथून पुढे ‘शिवशक्ती’ या नावाने ओळखलं जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
चांद्रयान 3 या मोहिमेत महिला वैज्ञानिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. चंद्राचा शिवशक्ती पॉइंट भारताच्या या संशोधकांच्या प्रयत्नांचा साक्षीदार म्हणून कायम राहील. हा शिवशक्ती पॉइंट येणाऱ्या पिढींना प्रेरणा देत राहील.आपल्याला विज्ञानाचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करायचा आहे. मानवतेचं कल्याण हीच आपली सर्वोच्च जबाबदारी आहे. येत्या काळात शिवशक्ती पॉईंट जगाला प्रेरणा देत राहील, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संबोधनात आणखी एक घोषणा केली आहे. 23 ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून साजरा केला जाईल, असं ते म्हणाले. 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला. याच दिवशी विक्रम लँडर चंद्रावर लँड झालं. या दिवशी प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानानं भरून आला. देशातील हा जल्लोष अवघ्या जगाने पाहिला. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून जाहीर केला जाईल, असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. त्यांचं अभिनंदन करत आपल्या संबोधनाला सुरुवात केली. मी दक्षिण आफ्रिकेत होतं. पण माझं मन तुमच्याकडे लागून राहिलेलं होतं. इस्रो सेंटरमध्ये आल्यावर मला वेगळाच आनंद वाटत आहे. भारतात येऊन लवकरात लवकर तुमचं दर्शन घ्यायचं होतं. तुम्हा सर्वांना मी सॅल्यूट करतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनाला सुरुवात केली.
आपण चंद्रयान मोहीम यशस्वी केलीय. हे साधारण यश नाहीये. तर अनंत ब्रह्मांडात भारताची वैज्ञानिक क्षेत्रातील उपस्थिती आहे. आज भारत चंद्रावर आहे आणि चंद्रावर भारताचा राष्ट्रीय गौरव आहे.आजचं जे यश आहे ते निव्वळ आपल्या शास्त्रज्ञांचं यश आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हे बोलत असताना मोदी भावूक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता.