राजस्थान : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे. यावेळी पदयात्रेदरम्यान अचानक मोदी-मोदी अशी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकाराचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या घोषणेदरम्यान राहुल गांधी यांनी कॅमेऱ्याकडे तोंड करुन घोषणा देणाऱ्यांना आणखी जोरात घोषणा देण्यास सांगितलं. राहुल गांधी यांनी हातवारे करत आणखी जोराने घोषणा द्या, असं सांगितल्याचं दिसून आलंय. शिवाय त्यांनी घोषणा देणाऱ्यांकडे पाहून फ्लाईंग किसही दिला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झालाय.
राजस्थान येथील खेल संकुल येथून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सोमवारी सकाळी सुरुवात झाली होती. ही यात्रा आज सकाळी झालवार इथून पुढे मार्गस्थ झाली. यावेळचा व्हिडीओ सध्या अनेकांनी शेअर केला आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील उमटल्यात.
भाजप आणि आरएसएस यांच्यावर राहुल गांधी यांनी निशाणा साधला होता. भाजप आणि आरएसएस जय श्रीराम आणि हे राम अशा घोषणा का देतात, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. हा सवाल उपस्थित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारत जोडो यात्रा सुरु असताना अचानक काही मोदी समर्थकांनी मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली.
राजस्थान : ‘भारत जोड़ो यात्रा’ के दौरान लगे Modi-Modi के नारे#BharatJodaYatra | #RahulGandhi pic.twitter.com/2Xc89JutM4
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) December 6, 2022
यावेळी अशोक गेहलोत, गोविंद सिंग दातास्रा, सचिन पायलट आणि इतर काँग्रेस मंत्री आणि आमदार हे देखील राहुल यांच्यासोबत होते. त्याच दरम्यान, ही घोषणाबाजी करण्यात आली. सकाळी लवकर ही यात्री मार्गस्थ झाली होती. आज ही यात्रा मोरु कलान खेल मैदान इथं मुक्कामाला थांबणार आहे. त्याआधी देवरीघाट आणि सुकेत असा टप्पा ही यात्रा पार पडणार आहे. सध्या या व्हिडीओची तुफान चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.