उत्तर प्रदेशातील हाथरस येथील फुलरई गावात मंगळवारी सत्संग झाला. तिथे चेंगराचेंगरीत 121 भाविकांचा जीव गेला. भोले बाबा नावाच्या अध्यात्मिक गुरुने हा संत्सग आयोजीत केला होता. त्याच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. चिखल असल्याने अनेक जण पडले. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि त्याच भाविकांना प्राण गमवावे लागले असे आतापर्यंत सांगण्यात येत होते. पण आता उपविभागीय अधिकाऱ्याने या घटनेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. त्यात या घटना नेमकी कशामुळे घडली आणि त्यामागील कारण कोणते, याची माहिती देण्यात आली आहे.
हे आहे खरे कारण
उपविभागीय अधिकाऱ्याने या घटनेचा अहवाल प्रशासनाला दिला. त्यानुसार, या सत्संगात जवळपास 2 लाखांहून अधिक भक्त दाखल झाले होते. भोले बाबा हा दुपारी 12.30 वाजता या कार्यक्रम स्थळी दाखल झाला. सत्संगाचा कार्यक्रम हा 1 तास चालला. त्यानंतर भोले बाबा मंडपातून 1.40 ला बाहेर पडला. तेव्हा त्याच्या पायाची धूळ माथी लागावी यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली. लोकांनी बॅरिकेट्सवरुन कुदून बाबाच्या वाहनाकडे धाव घेतली. त्याचवेळी बाबाचे खासगी सुरक्षा रक्षक आणि सेवेदारांनी या भक्तांना धक्का-बुक्की सुरु केली. त्यामुळे अनेक भक्त खाली पडले. चिखलामुळे काही भक्तांना उठता आले नाही. त्यांच्या अंगावरुन इतर भक्त गेले. गदमरल्यामुळे अनेकांचा जीव गेला. तर काही जण पायाखाली आल्याने त्यांचा मृत्यू ओढावला. धक्काबुक्की नसती झाली आणि शांततेचे आवाहन केले असते तर कदाचित ही दुर्घटना टळली असती, असा दावा करण्यात येत आहे.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
या घटनेनंतर पोलिसांनी भोले बाबाचा मुख्य सेवादार आणि आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण या एफआयआरमध्ये भोले बाबाचे नाव नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सत्संगासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती. 80000 भाविक येतील, असे अर्जात म्हटले होते. पण या ठिकाणी दोन लाखांहून अधिक भक्त आले होते.
घटनेच्या चौकशीसाठी समिती
या घटनेने उत्तर प्रदेश हादरले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला. या घटनेच्या चौकशीसाठी उच्च अधिकाऱ्यांची एक समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.