हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोठा ट्विस्ट आला आहे. सकाळपासून आघाडीवर आणि नंतर बहुमताच्या दिशेने गेलेली काँग्रेस अचानक पिछाडीवर आली आहे. दुसऱ्या राऊंडनंतर भाजपने अचानक दमदार कमबॅक केलं आहे. सध्या भाजप आघाडीवर असून काँग्रेस पिछाडीवर गेली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, निकालाच्या अजूनही बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत. हे सुरुवातीचे कल आहेत. त्यामुळे निवडणूक निकालांच्या कलात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या राऊंडपासून काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीनंतर काँग्रेस 51 जागांवर आघाडीवर होती. काँग्रेस बहुमताच्या पुढे गेल्याने काँग्रेस हरियाणात सत्ता स्थापन करेल असा कयास वर्तवला जात होता. तर या राऊंडमध्ये भाजप 31 जागांवर आघाडीवर होती. मात्र निकालात अचानक मोठा ट्विस्ट आला. भाजपने अनपेक्षितपणे दमदार कमबॅक करत 38 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 31 जागांवर आघाडी घेतली आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षातील लढत रंगतदार होत आहे. त्यामुळे हरियाणाच्या लाल मातीच्या कुस्तीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मोदींना जिलेबी पाठवू
सकाळी काँग्रेसला 67 जागांवर आघाडी होती. एकूण 90 जागांपैकी 67 जागांवर काँग्रेस विजयी होणार असा कल येत होता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. काँग्रेसच्या दिल्ली येथील मुख्यालयाच्या बाहेर जिलेबी आणि लाडू वाटप केलं जात होतं. यावेळी काँग्रेस नेते पवन खेडा यांनी प्रतिक्रिाय देताना भाजपवर टीका केली. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिलेबी पाठवणार आहोत. हे सुरुवातीचे कल आहेत. थोडी वाट पाहा. आज दिवसभर लाडू आणि जिलेबी खायला मिळेल याचा मला विश्वास आहे, असं पवन खेडा म्हणाले. यावेळी खेडा यांनी नायब सिंह सैनी यांना टोला लगावला. त्यांनाही आम्ही जिलेबी पाठवू. जम्मू काश्मीर आणि हरियाणात आमचं सरकार येईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असंही खेडा यांनी म्हटलं.
काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण?
काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. आता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होणार आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भूपेंद्र हुड्डा, कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला हे प्रमुख दावेदार आहेत. या तिघांनीही आपलीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
10 वर्षानंतर सत्तेत
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे काँग्रेस दहा वर्षापासून सत्तेच्या बाहेर होती. तब्बल दहा वर्षानंतर काँग्रेसचं सत्तेत पुनरागमन झालं आहे. मात्र काँग्रेस सत्तेत येणार हा सुरुवातीचा अंदाज होता. पण मतमोजणीच्या राऊंड गणिक चित्र बदलताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा 10 वर्षानंतर सत्तेत येणार की भाजप सत्तेची हॅट्ट्रीक करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.