पटना, बिहार | 28 जानेवारी 2024 : बिहारच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता थोड्याच वेळात एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज नितीश कुमार हे नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले ‘इंजिनिअर बाबू’ बिहारच्या राजकारणात इतके महत्वाचे का ठरतात? मागची 17 वर्षे नीतीश कुमार यांची बिहारच्या राजकारणावर घट्ट पकड असण्याची कारणं काय आहेत? पाहुयात…
बिहारच्या राजकारणात सतत बदल होत असतात. सातत्याने राजकीय युत्या आघाड्या होतात आणि त्या मोडतानाही दिसतात. अशात या राजकीय डावपेचात टिकून राहणं महत्वाचं ठरतं. यात नीतीश कुमार वरचढ ठरतात. कारण मागच्या 17 वर्षांपासून बिहारच्या राजकारणात सक्रीय आणि आपली स्पेशल स्पेस टिकवून आहेत. जरी आघाडी किंवा युती तोडली तरी बिहारमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकीय पक्षांना नीतीश कुमार यांनी आपल्या बाजूने असणं फायदेशीर ठरतं.
सत्तेत एनडीए असो की युपीए… पण बिहारच्या मुख्यमंत्रिपदी मागच्या कित्येक वर्षांपासून एकच चेहरा दिसतो आहे. नीतीश कुमार कधी राजदसोबत जात सरकार स्थापन करतात. तर कधी भाजपशी हात मिळवणी करतात. नीतीश कुमार यांची पुढची चाल काय असेल आणि ते कुणासोबत युती करतील याचा अंदाज बांधता येत नाही. मागच्या कित्येक दिवसांपासून नीतीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत होते. अचानकपणे त्यांनी आता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. थोडक्यात काय… तर जिथे स्पेस मिळेल त्यांच्याशी नीतीश कुमार हात मिळवणी करतात. तसे निर्णय घेतात.
नीतीश कुमार उच्च शिक्षित आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. जेव्हा नीतीश कुमार शिक्षण घेत होते. तेव्हा त्यांना ‘इंजिनिअर बाबू’ या नावाने ओळखलं जायचं पुढे हेच इंजिनिअर बाबूंनी बिहारच्या राजकारणात आपला जम बसवला. तसंच आजही त्यांची जादू कायम आहे. थोड्याच वेळात ते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतील.