नवी दिल्लीः आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयाने, आणि चित्रपटाच्या माध्यमातून लोकांवर छाप सोडणाऱ्या मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांची लालू यादव यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर आता राजकीय चर्चेना जोरदार उधान आले आहे. मनोज वाजपेयी यांनी आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत राजकीय नेत्यांचेही रोल केले आहेत. मात्र आता मनोज वाजपेयी खऱ्या आयुष्यातही नेता बनणार असल्याची चर्चा आहे. खरे तर मनोज वाजपेयी यांनी शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्याबरोबर भेट घेतली.
त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मनोज वाजपेयी आता आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करत असून त्यामुळेच त्यांनी लालू प्रसाद यादवांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.
लालू प्रसाद यादव आणि अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं असलं तरी ही भेट सहजा सहजी झाली नाही असं काही राजकीय विश्लेषक मानतात. या भेटीमुळे बिहारच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होतील असंही मत व्यक्त केलं जात आहे.
मनोज वाजपेयी आता चित्रपटांनंतर राजकारणात आपलं नशीब आजमावणार आहेत. लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या भेटीमुळे आता त्यांच्या मतदार संघाचीही चर्चा होऊ लागले आहे. बिहारमधील बेतियामधून ते लोकसभा निवडणूक लढवू शकतात असंही बोललं जात आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आपल्या पक्षाचे स्थान बळकट करण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी सिनेअभिनेते, कलाकारांना त्यांच्याकडून संधी दिली जात आहे.
मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल निरहुआ यांसारख्या अभिनेत्यांना राजकारणात आणून त्यांच्यासारख्या उमेदवारांना आता प्रोत्साहन दिले जात आहे.
त्यामुळे आता तेजस्वी यादव आणि राजद मनोज वाजपेयींच्या माध्यमातूनही आपले ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न राजदकडून केला जात आहे. त्यासाठीच बिहारच्या मातीशी आणि माणसांशी जवळचा असणारा चेहरा आहे.
बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप याला जंगलराज वापसी म्हणत आहे. माजी कायदा मंत्री कार्तिकेय कुमार यांच्या नावाने महाआघाडी सरकारची विशेषत: राजदची संपूर्ण देशात नामुष्की ओढावल्यामुळेही त्याचा परिणाम राजकारणावर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनोज वाजपेयी यांच्या आगमानामुळे आता राजदकडे एक चांगला चेहरा असल्याचे मत राजकीय नेत्यांसह राजकीय विश्लेषकही मानत आहेत.
लालू प्रसाद यादव यांची मनोज वाजपेयींनी भेट घेतल्यानंतर आगामी निवडणुकीत राजदमध्ये ते सामील होऊ शकतात, असंही ते बोलले जात आहे. मनोज वाजपेयी यांना राजदमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
यासोबतच त्यांना आगामी काळात राज्यसभा सदस्य म्हणूनही खासदार केले जाऊ शकते. मनोज वाजपेयी हे बिहारमधील बेतिया येथील रहिवासी असून तो जातीने ब्राह्मण आहे आणि बॉलीवूडमधील एक प्रस्थापित नावही आहे.
अशा स्थितीत बेतियामधून भाजपच्या विरोधात त्यांच्या नावाचाही विचार केला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.