पाटना : महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये राजकीय महाभूकंप पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपची साथ सोडत पुन्हा एकदा तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी घरोबा केलाय. नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बिहारमधील जनता दल युनायटेड आणि भाजपचं सरकार कोसळलं. त्यानंतर लगेच नितीश कुमार आणि तेजस्वी याजव यांनी राजभवनावर जात राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा (claim to form a Government) केलाय. मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी आपल्याला समर्थन दिलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना दिली आहे. इतकंच नाही तर 2017 मध्ये चूक झाली होती असंही नितीश कुमार यावेळी राज्यपालांना म्हणाल्याचं कळतंय.
I came here to meet Governor and gave my resignation. There are 7 parties including 164 MLAs along with Independents in Mahagathbandahan: Nitish Kumar at a joint presser with Tejashwi Yadav after meeting Governor pic.twitter.com/yg2Xp5NFmr
— ANI (@ANI) August 9, 2022
मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांनी 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सोपवलं आहे. राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की 2017 ला आमच्याकडून चूक झाली. तत्पूर्वी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव राजभवनावर दाखल झाले. तिथे त्यांनी राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवलं. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. इतकंच नाही तर माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची हिंदुस्तान आवाम मोर्चा (हम) देखील एनडीएतून बाहेर पडलाय. जीतन राम मांझी हे महाआघाडीला समर्थन देणार आहेत.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत बैठक केली. जोपर्यंत आम्ही भाजपसोबत होतो तोपर्यंत आम्ही युती धर्म पाळला. आमच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या सहमतीनंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमच्या सर्वच नेत्यांची इच्छा होती की भाजपपासून वेगळं व्हावं, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिली आहे.