राज ठाकरेंना अयोध्येत रोखणारे ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार? राज्यात आता नवा कुस्ती सामना!!

| Updated on: Nov 02, 2022 | 3:41 PM

आता महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेला ब्रिजभूषण सिंह येणार आहेत. त्यामुळे मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राज ठाकरेंना अयोध्येत रोखणारे ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार? राज्यात आता नवा कुस्ती सामना!!
Image Credit source: social media
Follow us on

प्रदीप कापसे, पुणेः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Shingh) येत्या काही दिवसात महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष विरुद्ध खासदार ब्रिजभूषण सिंह असा वेगळाच सामना आता रंगणार आहे. ब्रिजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. येत्या 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान राज्यात महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धा पुण्यात होतील. मात्र कुस्तीच्या या स्पर्धांवरून आता राजकारण तापण्याची चिन्ह आहेत.

मे 2022 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा आयोजित केला होता. मात्र राज ठाकरे यांनी मुंबईत उत्तर भारतीयांविरोधात जे आंदोलन केलं होतं, त्यासाठी आधी समस्त उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागा, अशी भूमिका उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली होती.

राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशात आले तर ते सहि सलामत परतू शकणार नाहीत, असे आव्हान ब्रिजभूषण सिंह यांनी दिलं होतं. एकिकडे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा सुरु असताना ब्रिजभूषण सिंह यांनी उत्तर प्रदेशात राज ठाकरेंना दिलेल्या आव्हानाची तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती.
ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून वारंवार दिली जाणारी आव्हानं पाहून राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता. मात्र आता महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेला ब्रिजभूषण सिंह येणार आहेत. त्यामुळे मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ या स्पर्धेचं आयोजन करत आहेत.

ब्रिजभूषण सिंह हे मूळ उत्तर प्रदेशातील गोंड येथील रहिवासी आहेत. उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील भाजपाचे खासदार आहेत. तसेच मागील 10 वर्षांपासून ते कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. अयोध्येच्या कुस्तीच्या आखाड्यात त्यांनी बराच काळ घालवला आहे.