नवी दिल्ली: भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेल्या वर्षभर केंद्र सरकारच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा लावावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावतीने करण्यात आले आहे. देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र दुसरीकडे यावरून भाजपा (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी एक ट्विट करत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल असं म्हटलं आहे. वरुण गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिधापत्रिकाधारक तिरंगा ध्वज घेण्यासाठी आपल्यावर बळजबरी केली जात असल्याचा आरोप करत आहेत. तसेच तिंरगा ध्वज घेण्यासाठी आम्हाला वीस रुपये द्यायला सांगत आहेत, तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुम्हाला मोफत धान्य मिळणार नसल्याचेही सांगण्यात आल्याची तक्रार या व्हिडीओमधून करण्यात आली आहे. यावरून वरुण गंधी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
वरुण गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जर गरिबांवर भार टाकणारा ठरला तर ते देशाचे दुर्दैव असेल. शिधापत्रिकाधारकांना आणि गरिबांना तिरंगा खरेदीची बळजबरी केली जात आहे. जर त्यांनी तिरंगा नाही घेतला तर त्यांना धान्य देखील दिले जात नाहीये. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तिरंगा आहे. मात्र अशा पद्धतीने जर गरिबांची गळचेपी हेत असेल तर ही गोष्ट लाजिरवाणी असल्याची टीका वरुण गांधी यांनी केली आहे.
आजादी की 75वीं वर्षगाँठ का उत्सव गरीबों पर ही बोझ बन जाए तो दुर्भाग्यपूर्ण होगा।
राशनकार्ड धारकों को या तिरंगा खरीदने पर मजबूर किया जा रहा है या उसके बदले उनके हिस्से का राशन काटा जा रहा है।
हर भारतीय के हृदय में बसने वाले तिरंगे की कीमत गरीब का निवाला छीन कर वसूलना शर्मनाक है। pic.twitter.com/pYKZCfGaCV
— Varun Gandhi (@varungandhi80) August 10, 2022
वरुण गांधी यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये काही मजूर दिसत आहेत. त्यांनी तक्रार केली आहे की, आम्हाला झेंडा घ्यायचा नाही मात्र झेंडा घेण्यासाठी आमच्यावर जबरदस्ती करण्यात येत आहे. आमच्याकडे पैसे नाहीत तरी आमच्याकडून वीस रुपये जबरदस्तीने वसूल केले जात आहेत. तिरंगा न घेतल्यास तुम्हाला रेशन मिळणार नाही असे आम्हाला सांगण्यात आल्याचे हे नागरिक म्हणत आहेत.