भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? यावर सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. तर पक्षातंर्गत मोठा खल सुरू आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेत यातील काही राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संघटनात्मक बदलावर भर देण्यात येणार आहे. तळागाळातील नेत्याला वरिष्ठ पदावर बसवण्याची खेळी खेळली जाऊ शकते. ओबीसी अथवा महिलेच्या हाती पक्षाची कमान देण्यावर पण भर देण्यात येत आहे.
शनिवारी बैठकीत चिंतन
भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक होत आहे. त्यात विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा होईल. संघटनात्मक निवडणुकांना या बैठकीत अंतिम रुप देण्यात येईल. या बैठकीत आगामी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येणार आहे. या बैठकीत अध्यक्ष पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता नाही, पण बैठकीच्या अखेरीस केंद्रीय नेतृत्व नवीन अध्यक्ष पदाविषयी मोठी घोषणा करू शकते.
लोकसभा निवडणुकीनंतर पहिली बैठक
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही पहिली बैठक आहे. यामध्ये राष्ट्रीय पदाधिकारी, राज्याचे अध्यक्ष, संघटन मंत्री आणि राज्यातील प्रभारी, सह प्रभारी सहभागी होतील. या एक दिवशीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि अमित शाह हे पण बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
बैठकीत मुख्य विषय हा संघटनात्मक धोरणांचा असेल. यामध्ये सदस्यता अभियान, तर स्थानिक ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंतच्या निवडणुकांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 6 महिने लागतील. याच दरम्यान चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पण आहेत. त्यामुळे राज्य अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांशी या राज्यातील घडामोडींविषयी वेगवेगळ्या स्तरावर चर्चा होऊन रणनीती आखण्यात येऊ शकते.
तळागाळातील कार्यकर्त्याचा शोध
या वृत्तानुसार, भाजपला पुढील अध्यक्षपदासाठी संघाच्या सहमतीची गरज आहे. अनेक मोठ्या नेत्यांना भाजपने विविध महत्वाच्या पदावर स्थान दिले आहे. त्यामुळे आता भाजप आणि संघ अध्यक्षपदासाठी तळागाळाशी नाळ असलेल्या नेत्याच्या शोधात आहे. अर्थात अजून याविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यावेळी महिला अथवा ओबीसी यांच्या हातात पक्षाची कमान देण्याचा प्रयत्न राहील. भाजपने अद्याप पक्षाची कमान महिलेच्या हाती दिलेली नाही.