नवी दिल्लीः बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी (BJP MP Sushil Modi) यांनी रविवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, नितीश कुमार (Nitish Kumar) उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे समजले आहे. त्यामुळे सुशील मोदी यांनी त्यांना जाहीर आव्हान देत म्हटले आहे की, नितीश कुमारांनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Loksabha Election 2022) कोणत्याही लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवावी. यावेळी त्यांचे डिपॉजिटच जप्त होणार असल्याचे सांगत त्यांनी घोटाळेबाजांचा पराभव करण्यासाठी भाजप आता पूर्ण ताकद लावून लढणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची एक मोट बांधण्यात गुंतले आहेत. दिल्लीत त्यांनी काही दिवसांपूर्वी अनेक दिग्गज नेत्यांची भेटही घेतली आहे.
2024 मध्ये भाजपच्या विरोधात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा राहण्याचे आवाहनही त्यांनी सर्व नेत्यांना केले. त्यामुळे जेडीयू हा त्यांचाच पक्ष नितीश कुमार हेच खरे पंतप्रधान दावेदार असल्याचे सांगत आहेत. व नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धीही नितीश कुमारच असल्याचे सांगत आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नितीश कुमार यांना उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती.
त्यानंतर अखिलेश यादवांच्या या ऑफरवर सुशील मोदी म्हणाले की, त्यांना उत्तर प्रदेशात आणून त्यांचे डिपॉजिटही जप्त व्हावं अशी त्यांची इच्छा आहे का असा सवाल त्यांनी केला होता.
अखिलेश यादव यांच्याकडे कोणताही उमेदवार नसल्याचे सांगत त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत जी परिस्थिती होती तिच परिस्थिती यांची होणार आहे. आणि भाजप पुन्हा एकदा जिंकणार आहे.
नितीश कुमार उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत असतील, तर बिहारमध्ये त्यांची राजकीय परिस्थिती काय असेल त्याचा विचार करा.
त्यामुळेच ते बिहारमधून पळून जात असल्याची टीकाही त्यांच्यावर त्यांनी केली आहे. नितीशकुमारांनी आपल्या पक्षाची स्थिती 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पाहिली होती, त्यामुळेच 2019 मध्ये ते आमच्यासोबत आले आणि त्यांचे निम्मे खासदार लोकसभेत पाहायला मिळाले.
नितीश कुमार यांच्यावर टीका करताना सुशील मोदींनी बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलही सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी छपरा, कटिहार आणि मुझफ्फरपूरमधील नुकत्याच झालेल्या घटना या बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचं चित्र स्पष्ट करतात असंही त्यांनी सांगितलं होतं.
छपराच्या मुफसिल पोलीस स्टेशन परिसरात दोन पोलिसांवर गुन्हेगारांनी हल्ला केल्यामुळे जखमी झाले होते, तर कटिहारमध्ये गुन्हेगारांनी थेट पोलीस स्टेशनवरच हल्ला चढविला होता.