अमेरिकेच्या सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे, या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम अदानी यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आल्यानं आता अदानी उद्योग समूह अडचणीत आला आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी गौतम अदानी यांना तातडीनं अटक करा अशी मागणी केली आहे, तसेच या प्रकरणावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. “जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्र आहेत, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत. आम्हाला माहिती आहे की सरकार अदानींवर कोणतीही कारवाई करणार नाही. कारण अदानी जर जेलमध्ये गेले तर मोदीही जातील असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच भाजपानं देखील पत्रकार परिषद घेतली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमधून त्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. अमेरिकेत दाखल खटल्यात काँग्रेस शासित राज्यांचा उल्लेख आहे, आरोप झालेल्या चारही राज्यात आमचं सरकार नव्हतं असं पात्रा यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले पात्रा?
अमेरिकेत दाखल खटल्यात काँग्रेस शासित राज्याचा उल्लेख आहे, आरोप झालेल्या चारही राज्यात आमचं सरकार नव्हतं. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असताना अदानींची गुंतवणूक आली, छत्तीसगडमध्ये बघेल मुख्यमंत्री होते मग पैसे कोणाच्या खात्यात जाणार? राहुल गांधी म्हणतात त्यांच्या कोणत्याही नेत्याची चौकशी करा त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, मग बघेल यांची चौकशी करा, अदानी यांनी राजस्थानमध्ये गुंतवणूक केली तेव्हा देखील तीथे काँग्रेसचंच सरकार होत. भारत आज जगात चौथ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था आहे, ती लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे, मात्र हे काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला सहन होत नसल्याचं पात्र यांनी म्हटलं आहे.
अदांनीवर नेमके आरोप काय?
सोलार एनर्जी कॉन्ट्रॅक्टसाठी लाच देण्याचा आरोप
दोन हजार दोनशे कोटींची लाच भारतीय अधिकाऱ्यांना देण्याचा आरोप
पैशांसाठी परदेशी गुंतवणूकदारांशी खोटं बोलल्याचा आरोप
अमेरिकी गुंतवणूकदारांच्या पैशांची गुंतवणूक असल्यामुळे अमेरिकेत केस दाखल