दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या एका फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्यामुळे एकच गदारोळ माजला. त्यानंतर फ्लाईटमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं. या घटनेचा एका व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून प्रवाशांना इमर्जन्सी गेटमधून खाली उतरवण्यात आल्याचं दिसत आहे. एवढंच नव्हे तर काही प्रवासी खाली उड्या मारतानाही दिसले. बॉम्बच्या या अफवेमुळे दिल्ली एअरपोर्टवर अक्षरश: गोंधळाचे वातावरण होते. सध्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून विमानाची कसून तपासणी करण्यात येत आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
एअरपोर्ट अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तपासासाठी विमान हे आयसोलेशन बे मध्ये नेण्यात आले आहे. विमान सुरक्षा तसेच बॉम्ब शोधक पथक सध्या घटनास्थळी दाखल झाले असून कसून तपास सुरू आहे. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.35 च्या सुमारास दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची बातमी मिळाली. ही सूचना मिळताच क्यूआरटी घटनास्थळी पोहोचले आणि सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानाची तपासणी केली जात आहे.
#WATCH | Passengers of the IndiGo flight 6E2211 operating from Delhi to Varanasi were evacuated through the emergency door after a bomb threat was reported on the flight. All passengers are safe, flight is being inspected.
(Viral video confirmed by Aviation authorities) https://t.co/el2q5jCatx pic.twitter.com/ahVc0MSiXz
— ANI (@ANI) May 28, 2024
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्येही मिळाली होती बॉम्बची सूचना
काही दिवसांपूर्वीच दिल्लीहून बडोद्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातही अशीच घटना घडली. तेथे एक टिश्यू पेपरवर बॉम्ब शब्द लिहीलेला आढळला आणि एकच गोंधळ उडाला होता. टेकऑफच्या आधी घडलेल्या या घटनेच्या वेळी विमानात 175 प्रवासी होते. त्यांना 15 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता धमकीची माहिती मिळाली होती, असे पोलिसांनी सांगितले होते.
संध्याकाळच्या सुमारास विमानाच्या टॉयलेटमध्ये एक टिशू पेपर सापडला. त्यानंतर सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करून प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि सुरक्षा एजन्सीद्वारे तपासणीसाठी विमान रिकामे करण्यात आले. मात्र त्यावेळीत विमानात काहीच स्फोटक अथवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. विमानात ही नोट ठेवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. तसेच प्लाइटमधील प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली होती.