बोम्मईंच्या पोकळ धमक्या, राज्यभरातून जशास तसं उत्तर

| Updated on: Dec 10, 2022 | 11:16 PM

उद्धव ठाकरे म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई केंद्रीय नेतृत्वापेक्षा मोठे समजतात का ?

बोम्मईंच्या पोकळ धमक्या, राज्यभरातून जशास तसं उत्तर
Follow us on

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्राचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटले तरी काही फायदा होणार नाही, असं बोम्मई म्हणालेत. बोम्मईंनी आतापर्यंत पोकळ धमक्या दिल्यात. सीमावादावरुन, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावीची भाषा सुरुच आहे. आणि आता बोम्मई स्वत:ला केंद्रीय नेतृत्वापेक्षाही मोठे समजायला लागल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. मात्र काही फायदा होणार नाही असं बोम्मई म्हणालेत.

महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. यापूर्वीही महाराष्ट्राने असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर तडजोड करणार नाही, असं बोम्मई म्हणाले.

यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई केंद्रीय नेतृत्वापेक्षा मोठे समजतात का ? कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई वाट्टेल ते बोलतायत, तरी हे चूपच का, असा सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी विचारला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बोम्मईंना बोलू द्या. कोर्टात बाजू मांडणार आहोत.

बोम्मईंच्या सततच्या चिथावणीनंतर संजय राऊतांनी पुन्हा शिंदे गटावर बोचरी टीका केलीय. शिंदे गटाच्या तोंडाला कुलूप असून, त्याची चावी दिल्लीत असल्याचं राऊत म्हणालेत.

सुप्रीम कोर्टात प्रकरणं असतानाही बोम्मई, आपल्या वक्तव्यांनी दोन्ही राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. 23 नोव्हेंबरला बोम्मईंनी जत तालुक्यातल्या 40 गावांवर दावा केला. 40 गावांना कर्नाटकात घेण्यासाठी विचार करत असल्याचं बोम्मई म्हणाले.

दुसऱ्याच दिवशी 24 नोव्हेंबरला अक्कलकोट आणि सोलापूरही कर्नाटक विलीन करावं असं ट्विट बोम्मईंनी केलं. आणि महाराष्ट्राला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. 2 डिसेंबरला महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, नाही तर कारवाई करु अशी धमकीच बोम्मईंनी दिली.

6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाद नको म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाईंनी जाणं टाळलं. पण तरीही कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करत हैदोस घातला.

कन्नड वेदिकेच्या उन्मादानंतरही, बोम्मईंनी हा तणाव महाराष्ट्रामुळंच निर्माण झाल्याच्या उलट्या बोंबा मारल्या. आणि आता मविआच्या खासदारांनी अमित शाहांची भेट घेतल्यावरही काहीही फायदा होणार नाही, असं वक्तव्य करुन बोम्मईंनी केंद्रीय नेतृत्वालाच आव्हानाची भाषा केली.

शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना अमित शाह हे बोम्मईंना सरळ करतील, असं वाटतं. बोम्मई आपल्या वक्तव्यांमधून कितीही हवाबाजी करत असले तरी, अमित शाहांनी सीमावादाच्या प्रश्नात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलंय. 14 तारखेला अमित शाह, शिंदे-बोम्मईंसोबत चर्चा करणार आहेत.