पाटणा : सध्या सोशल मीडियावर लग्नाचे (marriage) विचित्र व्हिडिओ (videoviral) खूप व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ बिहारमधील हजारीबागमधून समोर आला आहे, जिथे एका प्रियकराने (boyfriend) न घाबरता वरासमोरच वधूला कुंकू लावले. पुढे जे घडलं ते एखाद्या चित्रपटातील सीनलाही लाजवेल असं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर या तरूणाचे लग्न एका मुलीसोबत निश्चित झाले होते. त्यानंतर सागर संपूर्ण तयारीनिशी, बँड वाजवत, वराच काढून लग्नासाठी वधूच्या घरी पोहोचला. लग्नात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व विधी व्यवस्थित चालू होते. अखेर लग्नाची घटिका जवळ आली. वर-वधू एकमेकांना वरमाला घालत होते. तेवढ्यातच वधूचा प्रियकर सनी स्टेजवर पोहोचला आणि वराच्या समोरच त्याने वधूला कुंकू लावले. हे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. हे नक्की काय होतंय ते कोणालाच समजत नव्हतं.
समोर घडलेला प्रकार पाहून वराच्या बाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली आणि नंतर ते संतापलेच. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली.दोन्हीकडचे लोक एकमेकांना अक्षरश: बुकलून काढत होते. अखेर बऱ्याच वेळानंतर मारामारी, वादावादी थांबली. संघर्षानंतर दोन्ही बाजूंना समजावून सांगण्यात आले. परिणामी, वराचे लग्न झालेच नाही आणि तो वधूला न घेताच घरी परत गेला. त्यानंतर प्रियकर सनी आणि त्या मुलीचे लग्न लावून देण्यात आले.
या अनोख्या लग्न सोहळ्याची उपस्थितांमध्ये बरीच चर्चा रंगली.