नवी दिल्लीः भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पायाभूत सुविधांचा विकास झाला नसल्यामुळेच स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद वाढला असल्याचा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. लडाख दौऱ्यावर असताना त्यांनी जम्मू काश्मिरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रशासित प्रदेशात पायाभूत सुविधांचा विकास झाला नसल्यानेच या भागात दहशतवाद वाढण्यास हे एक कारण ठरले आहे.
बीआरओच्या निमंत्रणावरून संरक्षण मंत्री शुक्रवारी लडाखमध्ये आले होते. यावेळी बीआरओ 75 नव्या प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या एकूण 75 प्रकल्पांमध्ये 45 पूल, 27 रस्ते, दोन हेलिपॅड या कामांचाही यामध्ये समावेश आहे. ज्या योजनांचे उद्घाटन करण्यात आले आहे.
त्यापैकी 20 प्रकल्प हे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 18-18 प्रकल्प तर पाच उत्तराखंडमध्ये आहेत. आणि 14 प्रकल्प सिक्कीम, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकल्पांचे उद्घाटन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात येथे पायाभूत सुविधांचा अभाव आढळून आला.
त्यामुळेच या केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद वाढण्याचे हे एकमेव कारण असल्याचेही त्यांनी सांगितले. या अंतर्गत झालेल्या गडबड घोटाळ्यामुळेच येथील पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचा परिणाम लडाखसह संपूर्ण देशावर झाला आहे.
देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा विकास सुरू ठेवण्याचे आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच सर्व दुर्गम भाग देशाच्या इतर भागाशी जोडले जाणार आहोत.
आपण मिळून देशाला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ असे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यात बीआरओची महत्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.