नवी दिल्लीः एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रम हिंदीतून सुरू झाल्यानंतर आता अभियांत्रिकीचे (Engineerin) शिक्षणही हिंदीतून होणार असल्याचे उत्तर प्रदेशमधील एका विद्यापीठाने जाहीर केले आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, (AKTU) लखनऊ येथे आता प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदीमध्ये बी.टेक कोर्स सुरू करण्यात येणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण हिंदीतून सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर त्यासाठी लागणारी बीटेक अभ्यासक्रमांची पुस्तकेही तयार करण्याच्या कामाला गती आली आहे.
हिंदी माध्यमातील पुस्तके तयार करुन आणि प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठ ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ सोबत काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, कुलगुरू पीके मिश्रा सांगितले की, आता या विद्यापीठात आणि त्याच्याशी संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमात बीटेक शिकवसे जाणार आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सांगितले की, बीटेक बरोबरच इतर विभागातील पुस्तकंही आता हिंदीतून तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
हिंदीमधून बीटेकचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. हिंदी भाषेमुळे तांत्रिक शिक्षण घेणे सोपे जाणार असून ते विद्यार्थ्यांना सोयीचे जाणार आहे.
हिंदी भाषेतील अभ्यासक्रमामध्ये परीक्षा दिली जात असली तरी या परीक्षांच्या काळात दोन्ही भाषेत प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही प्रकारचा पर्याय उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना ज्या भाषेत उत्तर देणे सोपे जाणार आहे. त्या भाषेत ते उत्तर देऊ शकणार आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात अभियांत्रिकीचे वर्ग सुरु होतील असी अशा विद्यापीठाने व्यक्त केली आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम टेक्नॉलॉजिकल विद्यापीठांबरोबर संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांना बी.टेक हिंदीतून शिकवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून इंग्रजीमध्ये काही तांत्रिक शब्द असल्यास तेही हिंदीतच दिले जाणार आहेत.