इंदौर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोनमध्ये एक मोठा रस्ते अपघात झाला (accident) आहे. बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट पुलाखाली कोसळली. तब्बल 50 फूट खोल खाली बस कोसळल्याने 15 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला (15 people died) आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. प्रवासाला निघालेल्या या प्रवाशांना आपला हा शेवटचा प्रवास आहे असं वाटलंही नव्हतं. वाटेतच त्यांच्यावर काळा घातल्याने या प्रवाशांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ही खासगी बस होती. खरगोन येथे हा अपघात झाला. 50 फूट उंच पुलावरून ही बस खाली कोसळली. ही बस खरगोनच्या खरगोन टेमला मार्गावरील दसंगा येथे पोहोचली होती. तेव्हा बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं अन् बस थेट पुलाखाली कोसळली. त्यात 15 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 लोक जखमी झाले. त्यातील अनेकजण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेकांचे हातपाय मोडल्याचंही सांगितलं जातं. तर काहींच्या डोक्याला मार लागला आहे. या सर्वांवर युद्ध पातळीवर उपचार करण्यात येत आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यावर मध्य प्रदेश सरकारने जखमींवर मोफत उपचार तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
प्रचंड मोठा आवाज झाला
ही बस इंदौरकडे निघाली होती. रस्त्यातच हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. बस 50 फूटावरुन कोसळली तेव्हा काही तरी स्फोट व्हावा असा प्रचंड मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले. अनेकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा त्यांना बस कोसळल्याचं दिसून आलं. गावकऱ्यांनी मागचा पुढचा विचार न करता या बसमधून एका एका व्यक्तीला बाहेर काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनाही तात्काळ वर्दी देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनीही मदत कार्यास सुरुवात केली.
Madhya Pradesh | 15 people dead and 25 injured after a bus falls from a bridge in Khargone. Rescue operation underway: Dharam Veer Singh, SP Khargone pic.twitter.com/X66l8Vt7iT
— ANI (@ANI) May 9, 2023
ट्रॅक्टरमधून जखमींना…
तोपर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या आवाज करतच घटनास्थळी दाखल झाल्यान होत्या. रुग्णवाहिका येताच आधी जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. नंतर मृतहेद रुग्णालयात पाठवले. रुग्णावाहिका कमी पडल्या म्हणून त्यांना ट्रॅक्टर ट्रोलीतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
बघ्यांची गर्दी
अपघात झाल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी शेकडो लोक जमले. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने त्यांनाही पांगवण्याचं काम पोलीस करत आहेत. तर बघ्यांमधील अनेक लोक मदत कार्य करत आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच मृत आणि जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात रडारड आणि आक्रोश सुरू आहे.