नवी दिल्ली | 04 जानेवारी 2024 : देशात डोनेशन अर्थात देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या यादीमध्ये HCL Technologies चे शिव नाडर यांनी पहिला नंबर घेतला आहे. सलग तिसऱ्या वर्षी शिव नाडर यांनी दानशूर व्यक्तीच्या यादीत आपले नाव पहिल्या नंबरवर ठेवले आहे. 1945 मध्ये तामिळनाडूमधील मूलीपोझी गावात सामान्य कुटुंबात शिव नाडर यांचा जन्म झाला. त्याचे सुरुवातीचे आयुष्य कठोर परिश्रम आणि आर्थिक अडचणींनी भरलेले होते. वडील लहानपणीच वारले. पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, कोईम्बतूर येथून त्यांनी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यापेक्षा नाडरने यांनी धाडस केले आणि एलिट डीसीएम मॅनेजमेंट येथे ट्रेनी सिस्टमचा भाग म्हणून सुरवात केली.
मायक्रोप्रोसेसर हे पुढे जग बदलतील या दृष्टीने त्यांनी 1976 मध्ये दिल्ली बरसातीमध्ये “गॅरेज स्टार्टअप प्रमाणे” हिंदुस्तान कॉम्प्युटर्स लिमिटेड (HCL) सुरू केली. पाहता पाहता ही कंपनी भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी बनली. 2 लाखाहून अधिक कर्मचारी आणि 50 हून अधिक देशांमध्ये शाखा हे HCL चे यश मानावे लागेल. शिव नाडर यांची सध्याची एकूण संपत्ती $33.1 अब्ज इतकी आहे. ज्यामुळे ते भारत आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले.
जुलै 2020 मध्ये त्यांनी HCL टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा यांच्याकडे हे पद सोपवले. ते आता अध्यक्ष एमेरिटस आणि धोरणात्मक सल्लागार आहेत. दुसरीकडे, शिव नाडर यांनी प्रथम क्रमांकाचे परोपकारी व्यक्ती म्हणूनही मान पटकावला आहे. फोर्ब्स 2023 च्या यादीनुसार ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार शिव नाडर यांनी 2042 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात त्यांनी दररोज सरासरी 5.6 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर, विप्रोचे अझीम प्रेमजी यांनी 1774 कोटी रुपयांची देणगी देऊन दुसरा क्रमांक घेतला आहे.