संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : राज्यासह केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion ) हा लांबणीवर पडला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या वतिने शिंदे गटाला दोन मंत्रीपद दिले जाणार आहे. त्यातच सुप्रीम कोर्टासह केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे गटासह ठाकरे गटाची सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने ( Election Commission ) देखील निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे केंद्र सरकारसह राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरुन सुप्रीम कोर्टासह केंद्रीय निवडणूक आयोगात संघर्ष सुरू असल्यानं हा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. फेब्रुवारी अखेर हा वाद मिटेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र राज्यासह केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या काही दिवसांपासून लांबणीवर पडलेला आहे. यामध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार अशी चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारचा ही मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
यामध्ये शिंदे गटाच्या दोन खासदारांना एक मंत्री पद आणि एक राज्यमंत्री पद दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा स्वरूपाची माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याचं बोललं जात होतं, मात्र त्यातच राज्यातील सत्तांतर झालं आणि त्यानंतर आता शिंदे गटाला देखील दोन मंत्रीपद आता मिळणार आहे.
यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. केंद्रातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा स्वरूपाची देखील माहिती समोर येत आहे.
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवसेना कुणाची धनुष्यबान चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगामध्ये सध्या निर्णय प्रलंबित आहे. दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आलेला असला तरी याबाबत निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय दिलेला नाही.
निर्णय राखून ठेवल्याने हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. याशिवाय राज्यातील सत्तांतराच्या संदर्भातही सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. असे दोन्ही निकाल प्रलंबित असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे.
भाजपसोबत शिवसेना पक्षाची युती असतांना शिवसेना केंद्राच्या मंत्रिमंडळात दोन मंत्रीपदे होती. त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांची युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीत शिवसेना गेल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला होता.
शिवसेनाला जे स्थान केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान होते तेच स्थान आता शिंदे गटाला देखील दिले जाणार आहे. हे जवळपास निश्चित असले तरी दुसरीकडे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निकाल न दिल्याने ही सर्व प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.