नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकऱ्यांचं गेल्या 8 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांनी केंद्राचा पद्म विभूषण पुरस्कार परत केला आहे. तर अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह ढिंढसा यांनी आपला पद्म भूषण पुरस्कार परत करणार असल्याचं सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आता पंजाबमधील खेळाडूही पुढे आले आहेत. त्यांनीही अवॉर्ड वापसी मोहीम हाती घेतली आहे. (Campaign to return the award of veteran players)
भारताचे माजी बास्केटबॉल खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेते सज्जच सिंह चिमा हे गेल्या दोन दिवसांपासून अर्जुन आणि पद्म पुरस्कार विजेत्या पंजाबमधील खेळाडूंशी पुरस्कार वापसी मोहीमेसाठी संपर्क करत आहेत. चिमा यांना अनेक पुरस्कार विजेत्या 30 खेळाडूंची साथ मिळाली आहे. त्यात गुरमेल सिंह, सुरिंदर सिंग सोढी यांसारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू 1980 ला मॉस्कोमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचं प्रतिनिधित्व करत होते. या संघानं त्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं.
या सर्व खेळाडूंची जालंधर इथं बुधवारी बैठक पार पडली. त्यात केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पुरस्कार वापसीचा निर्णय या खेळाडूंनी घेतला आहे. चिमा यांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मश्री, ऑलिंपिक, अर्जुन पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागणार आहेत. त्यांची वेळ मिळाली नाही तर 5 डिसेंबरला हे सर्व खेळाडू दिल्लीला जाणार आहेत आणि आपल्याला मिळालेले पुरस्कार परत करणार आहेत.
‘शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. ज्या मातीतून शेतकरी पिक घेतो त्याच मातीतून खेळाडू जन्माला येतो. त्यामुळे आम्ही खेळाडू शेतकरी आंदोलनापासून दूर कसे राहू’, असं सज्जन सिंह चिमा म्हणाले. जालंधरमध्ये पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू सहभागी झाले होते. कृषी कायद्यामुळे फक्त शेतकऱ्यांचंच नाही तर संपूर्ण देशवासियांचं नुकसान होणार असल्याचं मत या खेळाडूंनी व्यक्त केलं.
सज्जन सिंह चिमा हे भारतीय बास्केटबॉल संघाचे खेळाडू राहिले आहेत. 1982मध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये त्यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तसंच ते पंजाब पोलीस दलातून पोलीस अधीक्षक पदावरुन निवृत्त झाले आहेत.
चिमा यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. सध्या त्यांची प्रकृती बरी नसून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपण नुकतेच ICU मधून बाहेर आलो आहोत आणि लवकरच बरा होऊन खेळाडूंच्या अवॉर्ड वापसी मोहीमेत सहभागी होईल, असं चिमा माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संबंधित बातम्या:
कृषी कायद्यातील सर्वाधिक वादग्रस्त क्लॉज कोणता?; पी. साईनाथ म्हणतात…
Campaign to return the award of veteran players