रेल्वे भरतीची प्रश्नपत्रिका थेट व्हॉट्सअपवर, मुंबई, सुरतसह 12 ठिकाणी सीबीआयच्या धडाधड धाडी

| Updated on: Jan 10, 2024 | 12:01 PM

पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती केंद्राने घेतलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणात सीबीआयने ( केंद्रीय अन्वेषण विभाग) 12 ठिकाणी धाड टाकली आहे. मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्सर अशा विविध ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले.

रेल्वे भरतीची प्रश्नपत्रिका थेट व्हॉट्सअपवर, मुंबई, सुरतसह 12 ठिकाणी सीबीआयच्या धडाधड धाडी
cbi
Follow us on

मुंबई | 10 जानेवारी 2024 : पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती केंद्राने घेतलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणात सीबीआयने ( केंद्रीय अन्वेषण विभाग) 12 ठिकाणी धाड टाकली आहे. मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्सर अशा विविध ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून या कारवाईमध्ये ‘सीबीआय’च्या पथकांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले आहेत. रेल्वे भरती केंद्राद्वारे घेण्यात आलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या. त्याप्रकरणी पश्चिम रेल्वेतर्फे तक्रार नोंदवण्यात आली होती.

या तक्रारीच्या आधारे, प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपाखाली रेल्वेचे काही अधिकारी आणि मुंबईतील एका खासगी कंपनीच्या अज्ञात अधिकाऱ्यांसह अन्य संबंधितांविरोधात ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला आहे. व्हॉट्सअपवर काही उमेदवारांकडे या परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध होती, असा आरोप लावण्यात आला होता.

‘जीडीसीई’च्या कोट्यातून 3 जानेवारी 2021 रोजी रेल्वेमध्ये बिगर-तांत्रिक श्रेणी (नॉन ग्रॅज्युएट), कनिष्ठ लिपिक/‘टायपिस्ट’ आणि प्रशिक्षित लिपिक या पदासाठी संगणक आधारित परीक्षा घेण्यात आली होती. मुंबईसह अहमदाबाद, इंदूर, राजकोट, सुरत, बडोदा, अशा सहा शहरांमध्ये 28 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत 8,603 उमेदवार सहभागी झाले होते.

‘जीडीसीई’च्या परीक्षेला बसलेल्या काही उमेदवारांकडून पैसे घेऊन परीक्षा सुरू होण्यापूर्वी उत्तरांसह प्रश्नपत्रिका पुरवल्या गेल्या. काही उमेदवारांना व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे तर काही उमेदवारांना मेळाव्याद्वारे प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष दाखवण्यात आली. शिवाय, परीक्षेच्या काही दिवसांनंतर उमेदवारांना व्हॉट्सअॅप लिंकद्वारे परीक्षेचा निकालही देण्यात आला होता. परीक्षा संचालन संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कंपनीच्या माध्यमातून हा सर्व प्रकार घडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याच प्रकरणाचा तपास करताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी 12 ठिकाणी धाड टाकत अनेक महत्वपूर्ण कागदपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले.