कोलकाता : विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील (West Bengal election) वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे कोलकाता पोलिसांनी (Kolkata police) भाजप युवा मोर्चाची राज्य सचिव पामेला गोस्वामीला (BJP youth leader Pamela Goswami ) ड्रग्जसह रंगेहाथ पकडलं. तर आता सीबीआयने कोलकात्यात (CBI) एण्ट्री घेत, थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे (Mamata Banerjee) पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यावर धाड टाकली. ( CBI summons wife of Abhishek Banerjee, who is the nephew of West Bengal Chief Minister Mamata Banerjee, in coal pilferage case: Officials)
भाच्यावर धाड म्हणजेच थेट ममतांच्या घरात सीबीआयची एण्ट्री अशी चर्चा कोलकात्यात सुरु आहे. सीबीआयने रविवारी अभिषेक बॅनर्जींच्या घरी छापेमारी केली. सीबीआयने अभिषेक बॅनर्जींची पत्नी रुजिरा नरुला (Rujira Banerjee Narula) यांच्या हातात नोटीस ठेवली. दोघांनाही सीबीआय चौकशीला सामोरं जायचं आहे.
सीबीआयने नोटीस पाठवल्यानंतर, रुजिरा नरुला यांनी सीबीआयला चिठ्ठी लिहून, घरीच येण्याचं निमंत्रण दिलं. उद्या म्हणजे 23 फेब्रुवारीला माझ्या घरीच येऊन माझी चौकशी करु शकता, असं नरुला यांनी सीबीआयला लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
दुसरीकडे सोमवारी दुपारी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची मेहुणी मेनका गंभीर यांच्या घरावरही सीबीआयने धाड टाकली.
सीबीआयचे अधिकारी दोन गाड्यांमधून मेनका गंभीर यांच्या घरी पोहोचले. जवळपास तीन तास त्यांनी झाडाझडती केली.
हे संपूर्ण प्रकरण कोळसा तस्करीतून कमावलेल्या अवैध रकमेचं आहे. गेल्या वर्षभरापासून सीबीआय या प्रकरणाची पाळमुळं खणण्याचा प्रयत्न करत आहेत. तस्करीप्रकरणातील म्होरक्या अनुप लाला याच्याशी खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय आहे. त्यामुळेत ते सीबीआयच्या रडारवर आहेत.
अनुप लालाने काही बँक ट्रान्झॅक्शन अभिषेक बॅनर्जींची पत्नी रुजिरा नरुला यांच्या खात्यावर केल्या, जे खातं परदेशी बँकेत असल्याचा आरोप आहे.
सीबीआय सध्या याच परदेशी बँक खात्यातील व्यवहाराशी संबंधित चौकशी करत आहे. याबाबत अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “सीबीआयने रविवारी दुपारी 2 वाजता माझ्या पत्नीच्या हाती नोटीस सोपवली. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र त्यांना जर वाटत असेल की अशा प्रकारांनी आम्ही घाबरुन जावू, तर तो त्यांचा गैरसमज आहे. आम्ही त्यांच्यासमोर कधीही झुकणार नाही”
बंगालमध्ये भाजप सूडाचं राजकारण करत आहे, असा हल्लाबोल अभिषेक बॅनर्जी यांनी केला.
बंगालमधील भाजपच्या युवा मोर्चाची एक महिला नेता अडचणीत आली आहे. या महिला नेताचे नाव पामेला गोस्वामी असं आहे. पामेला हीने कारमध्ये कोकीन हे ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं आहे. पामेला गोस्वामी आपल्या कारमधून कोकीन हे ड्रग्ज घेऊन जात होती. पोलिसांना याबाबत खबर मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी कारवाई केली. या कारवाईत गोस्वामी रंगेहाथ पकडली गेली.
( CBI summons wife of Abhishek Banerjee, who is the nephew of West Bengal Chief Minister Mamata Banerjee, in coal pilferage case: Officials)