नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : भारताची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरला संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात अतिशय महत्त्वाचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे देशात सर्व निवडणुका या आगामी डिसेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. केंद्र सरकार या विशेष अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’ याबाबतचं विधेयक मांडू शकतं. संसदेच्या दोन्ही सभाग त्यामुळे या विशेष अधिवेशनाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विशेष अधिवेशनाबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनाआधीच हे पाच दिवसांचं स्पेशल अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे या अधिवेशनाला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. ऐन गणेशोत्सवाच्या काळात हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. एक देश एक निवडणूक विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांची काय भूमिका असेल ते पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2014 मध्ये सत्ता आल्यानंतर एक देश एक निवडणूक याबाबतची चर्चा समोर आली होती. त्यानंतर वारंवार याबाबत चर्चा होत राहिल्या. एक देश एक निवडणूकसाठी भाजप आग्रही आहे. त्यामुळे याचबाबतचा अध्यादेश सरकार आणण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात 6 विधेयक मांडली जाणार आहेत. तसेच सात ते आठ बैठका होणार आहेत.
केंद्र सरकारने बोलावलेल्या या अधिवेशनावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रियी आली आहे. ऐन गणेशोत्सवच्या काळात हे अधिवेशन बोलावणं ही दुर्देवाची बाब आहे. तसेच यामुळे हिंदुच्या भावना दुखावणार आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने अचानक बोलावलेल्या या विशेष अधिवेशामुळे 2023 मध्येच निवडणुका पार पडणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, राम मंदिराचं लोकार्पण जानेवारी महिन्यात आहे. त्याआधी सरकार याबाबतचा निर्णय घेणार नाही, अशी देखील चर्चा सुरु आहे. दुसरीकडे जी 20 ची बैठक 8,9,10 सप्टेंबरला दिल्लीत बैठक होणार आहे. त्यानंतर लगेच हे अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा देखील होऊ शकते. त्यामुळे हे निवडणूक अतिशय महत्त्वाचं असणार आहे.