नवी दिल्ली: महाराष्ट्रासह काही राज्यांत कोरोना रुग्णांची (Coivd 19) संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्यामुळे केंद्र सरकार सावध झाले आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने पूर्ण वेग पकडलेला नाही. (Central govt asks to increase vaccination speed in all states due to threat of coronavirus second wave)
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात अद्याप कोरोना लसीच्या सुरक्षिततेविषयी शंका आहेत. त्यामुळेच काही आरोग्य कर्मचारी लस घेण्यास कचरत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेण्याचे आवाहन केले होते. या लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर तरी महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग वाढणार का, हे पाहावे लागेल.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याकडून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात पन्नाशीपुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे.
लोकांनाही तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे. मार्च 2021 पासून सहआजार (को-मॉर्बिडिटी) असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू करावे लागेल. त्यासाठी आगामी काळात उपविभागीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य उपकेंद्रे यांनी १ मार्चपासून लसीकरणाची आणखी व्यापक व्यवस्था करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 फेब्रुवारी) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. तसेच महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन लावणार की नाही याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. “नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम पाळले नाही आणि संसर्गाचं प्रमाण असंच सुरु राहिल्यास आपल्याला राज्यात लॉकडाऊन करावा लागेल,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुढचे 8 दिवस त्यासाठी महत्वाचे असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सुचित केलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही याचा निर्णय पुढच्या आठ दिवसात होऊ शकतो. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील असं मुख्यमंत्री म्हणालेत.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायचा का? मुख्यमंत्र्यांचं जनतेला 8 दिवसांचं अल्टीमेटम
कोरोनाची दुसरी लाट धडका मारतेय, बंधनं घालावीच लागतील : मुख्यमंत्री
(Central govt asks to increase vaccination speed in all states due to threat of coronavirus second wave)