नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : स्कील डेव्हलपमेंट घोटाळ्यात अखेर चंद्रबाबू नायडू यांना अटक झाली. कधीकाळी देशात आयटी लाट आणणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu ) यांना सकाळीच उचलण्यात आले. त्यांच्यावर 550 कोटी रुपयांच्या स्कील डेव्हलपमेंट घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये ही योजना ( Skill Development Scam) सुरु करण्यात आली होती. योजनेतंर्गत सहा क्लस्टर होते. त्यासाठी 3300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. या घोटाळ्यात तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष नायडू यांना सीआयडीने ही अटक केली. ते भारतातील पाच सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत, हे अनेकांना माहिती नाही. त्यांच्याकडे एकूण इतकी संपत्ती आहे.
इतके आहेत शेअर
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, चंद्रबाबू नायडू यांच्याकडे एकूण 668.57 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांच्यावर केवळ 15 कोटींचे कर्ज आहे. इतकी अफाट संपत्तीमागे त्यांच्या 545 कोटी रुपयांच्या हेरिटेज फुड्स लिमिटेड कंपनीतील हिस्सेदारीचा वाटा आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे एकूण 1,06,61,652 शेअर आहे. 2019 मधील प्रतिज्ञापत्रानुसार एका शेअरचे मूल्य 511.90 रुपये आहे. सध्या या शेअरमध्ये घसरण झाली आहे. त्यांचे मूल्य कमी होऊन 272 रुपयांपर्यंत खाली उतरले आहे. त्यामुळे चंद्रबाबू नायडू यांच्या संपत्तीचे मूल्य 289 कोटीपर्यंत खाली उतरले आहे. याशिवाय त्यांच्याकडे विजया बँकेचे 100 शेअर आहेत. ही बँक आता बँक ऑफ बडोद्यात विलीन झाली आहे. त्यांच्या बँक खात्यात सध्या जवळपास 45 लाख रुपये रोख आहेत. तर पत्नीच्या खात्यात 16 लाख रुपये जमा आहेत.
इतकी आहे संपत्ती
एन. चंद्रबाबू नायडू हे आंध्रप्रदेशातील चित्तूर येथील कुप्पम या विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. 2019 मध्ये आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी शपथपत्र दाखल केले आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे एकूण 600 कोटी रुपयांची संपत्ती आहे. संपूर्ण देशात केवळ तीनच असे आमदार आहेत, ज्यांच्याकडे चंद्रबाबू नायडू यांच्यापेक्षा अधिक संपत्ती आहे. हे तीनही लोकप्रतिनिधी दक्षिणेतील राज्यातीलच आहेत.
स्थावर जंगममध्ये मोठी गुंतवणूक
चंद्रबाबू नायडू यांनी सोने, जंगम, स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पत्नीकडे एकूण 2 कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, रत्न आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 45 कोटी रुपयांची शेती, 29 कोटी रुपयांच्या व्यावसायिक इमारती आणि 19 कोटींचा बंगला आहे. त्यांच्याकडे एकूण 94 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
चंद्रबाबू यांच्यापेक्षा श्रीमंत आमदार
देशातील सर्वाधिक श्रीमंत आमदार, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1413 कोटी रुपये आहे. त्यानंतर कर्नाटकचे के. एच. पुत्तुस्वामी गौडा हे श्रीमंत आमदार आहेत. त्यांच्याकडे एकूण 1267 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर कर्नाटकचे प्रियकृष्णा हे 1156 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. देशातील पाचवे सर्वात श्रीमंत आमदार गुजरातमधील जयंतीभाई सोमाभाई पटेल हे आहेत. त्यांच्याकडे एकूण 661 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.