नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सफल लॅंडींग करुन नवा विक्रम केला आहे. आपला देश भारत दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणारा जगातला एकमेव देश ठरला आहे. विक्रम लॅंडरमधून प्रज्ञान रोव्हर आता चंद्रावर पाण्याचा आणि खनिजांचा शोध घेऊन संशोधनात आघाडी घेणार आहे. विक्रम लॅंडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला आहे, तो चंद्राच्या भूमीचा अभ्यास करणार आहे. मात्र, 14 दिवसांनी जेव्हा प्रकाश नष्ट होईल तेव्हा विक्रम आणि प्रज्ञानचे काय होणार ? इस्रोने काय म्हटले पाहा
चार वर्षांपूर्वी साल 2019 मध्ये चंद्रावर लॅंडींग फसल्यानंतर आता बुधवारी सफल लॅंडींग करुन भारत अमेरिका, रशिया आणि चीनच्या बरोबर एलीट क्लबमध्ये सामील झाला आहे. भारताच्या चंद्रयान-3 ने 23 ऑगस्ट 2023 च्या सायंकाळी आधीच जाहीर केलेल्या वेळेवर सायं. 6.04 वा. दक्षिण ध्रुवावर लॅंडींग केल्यानंतर इस्रोच्या कार्यालयासह देशभरात टाळ्यांचा कडकडाट झाला. भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन आला. चंद्रयान-3 मधील विक्रम लॅंडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला असून 14 दिवस तो ( चंद्राचा एक दिवस ) दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करणार आहे. चंद्राच्या जमीनीतील मिनरल कंपोझिशनचा स्पेक्ट्रोमीटरद्वारे एनालिसिस केले जाणार आहे. परंतू हे चौदा दिवस संपल्यानंतर नेमके विक्रम आणि रोव्हर यांचे काय होणार याबाबत इस्रोने माहीती दिली आहे.
चंद्रयान-3 चे लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञानला सोलर पॅनलने वीजपुरवठा होत आहे. ते 14 दिवस काम करणार आहेत. त्यावेळी सूर्यप्रकाश असल्याने हा निर्णय घेतला आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुर्यादय होत असल्याने ही तारीख लॅंडींग साठी निवडली गेली आहे. त्यानंतर चंद्राच्या सुर्यप्रकाश जात असल्याने रात्रीचे तापमान – 180 पर्यंत खाली जाऊन यंत्रणा काम करु शकणार नाही त्यामुळे जर 23 ऑगस्टला लॅंडींग यश आले नसते तर लगेच दुसऱ्या दिवशी प्रयत्न करावा लागला असता, अन्यथा पुढील सुर्योदयाची वाढ पहावी लागली असती. आणि 29 दिवसानंतर लॅंडींग करावे लागले असते.
इस्रोचे चेअरमन एस.सोमनाथ यांनी सांगितले की जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत सर्व सिस्टीमला पॉवर मिळेल. सूर्य मावळल्यानंतर अंधार पसरुन ही तापमान एकदम निच्चांक गाठेल. मायनस 180 तापमान झाल्यास सिस्टीमचा त्यात तगू शकण्याची शक्यता कमी असते. तर सिस्टीम त्यात टीकली तर आमच्यासाठी अत्यानंदाचा दिवस असेल कारण आम्हाला आणखी 14 दिवस मिळतील, आम्हाला आशा आहे असे होईल.