चंद्रयान-3 चंद्राच्या आणखीन जवळ पोहचले, कक्षेत केला बदल, आता 23 ऑगस्टवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या

| Updated on: Aug 09, 2023 | 4:50 PM

चंद्रयान-3 आता पर्यंतच्या सर्व पायऱ्या एकामागोमाग एक यशस्वी पार पाडत चंद्राच्या जवळ चालले आहे. 23 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. असं करणारा भारत पहिला देश ठरणार आहे.

चंद्रयान-3 चंद्राच्या आणखीन जवळ पोहचले, कक्षेत केला बदल, आता 23 ऑगस्टवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या
CHANDRAYAAN 3
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : भारताच्या चंद्रयान-3 ने आणखी एक महत्वाचे काम पूर्ण केले आहे. ते आता बुधवारी चंद्राच्या आणखीन जवळ पोहचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) इस्रोने चंद्रयान-3 ने मॅन्युव्हर ऑर्बिट पूर्ण करीत आपली कक्षा घटविली आहे. आता चंद्रयान चंद्राच्या 174 किमी बाय 1437 किमी लंबवर्तुळाकार कक्षेत फेऱ्या मारणार आहे. भारताच्या चंद्रयान-1 या पहिल्याच मोहीमेत चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे शोधण्यात भारताला यश आले होते. आता चंद्रावर लॅंडर आणि रोव्हर पाठवून विविध प्रयोग आणि परीक्षणे केली जाणार आहेत.

चंद्रयान-3 मोहीम भारताची महत्वाकांक्षी मोहीम मानली जात असून 14 जुलै 2023 रोजी आंध्रातीस श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटरमधून चंद्रयान-3 रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आल होते. आता येत्या 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान चंद्रावर सॉफ्ट लॅंडींगचा प्रयत्न करणार आहे. चंद्रयानाने चंद्राच्या कक्षेत 5 ऑगस्ट 2023 रोजी यशस्वी प्रवेश करीत महत्वाची पायरी पार पाडली होती.

बुधवारी चंद्रयान-3 च्या कक्षेत बदल करीत ती घटविण्यात आली असल्याचे इस्रोने जाहीर केले आहे. आता इस्रो येत्या 14 ऑगस्ट रोजी स. 11.30 ते 12.30 दरम्यान चंद्रयान-3 ची कक्षा आणखीन घटविणार आहे. त्यामुळे ते चंद्राच्या आणखीन जवळ जाणार आहे. चंद्रयान-3 आता पर्यंतच्या सर्व पायऱ्या एकामागोमाग एक यशस्वी पार पाडत चंद्राच्या जवळ चालले आहे. त्यामुळे आता 23 ऑगस्ट रोजी सायं. 5.47 वाजता होणाऱ्या अंतिम सॉफ्ट लॅंडींग या महत्वाच्या घडामोडीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. चंद्राच्या आजपर्यंत कधीच नजरेस न आलेल्या दक्षिण पोलवर चंद्रयान सॉफ्ट लॅंडींग करणार आहे.

दक्षिण ध्रुवावरच लक्ष 

भारताचे चंद्रयान-3 आता 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींगचा प्रयत्न करणार आहे. चंद्राच्या या भागात तापमान अंत्यत कमी आहे. शिवाय येथे विवरांचे प्रमाण जास्त असल्याने इतर देशांनी येथे लॅंडींग करणे टाळले आहे. परंतू भारताने आतापर्यंत तीन मोहिमांमध्ये याच दक्षिण पोलवरच लक्ष केंद्रीत केले आहे.