मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचा आज अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 3 चं लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आज उरणार आहे. त्यासाठी सगळी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परिस्थिती अनुकूल असेल तर चांद्रयान आजच उतरवलं जाईल. अन्यथा इस्रो आपला प्लॅन बी अॅक्टिव्ह करेल. येत्या 27 तारखेला हे लँडिग करण्यात येईल. मात्र आज जर हा प्रयोग यशस्वी झाला. तर मात्र पुढचे 14 दिवस भारतीय अवकाश संशोधन संस्थसाठी आणि भारतासाठी अत्यंत महत्वाचे असतील. पुढचे 14 दिवस हे लँडर आणि रोव्हर चंद्रावर असेल. तिथं वेगवेगळ्या बाबींवर संशोधन केलं जाईल. या 14 दिवसांमध्ये नेमकं काय घडेल? जाणून घेऊयात…
चंद्राच्या दक्षिण धृवावर हे लँडर उतरणार आहे.चांद्रयान लँड झाल्यास पुढच्या 14 दिवसात चंद्रावर संशोधनास सुरुवात केली जाईल. यात चंद्रावर पाणी आहे का? पाण्याचे काही अंश आढळतात का ते पाहणं महत्वाचं असेल. चंद्रावर जीवसृष्टी निर्माण होऊ शकते का? तिथं वातावरण असू शकतं का याचं संशोधन केलं जाईल.
चंद्राच्या दक्षिण धृवावरच चांद्रयान 3 उतरणार आहे. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठमोठे डोंगर-खड्डे आहेत. या भागात सूर्याची किरणे तिरपी पडतात. त्यामुळे बहुतांश भागामध्ये अंधार असतो. यातील अनेक खड्डे अब्जावधी वर्षापासून अंधारात आहेत. कायम अंधार असल्यामुळे हा भाग प्रचंड थंड आहे. -203 डिग्री सेल्सियस इतकं इथलं तापमान आहे. इथं पाणी आणि खनिज सापडण्याची शक्यता अधिक आहे. खगोलीय संशोधनाच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा आहे. त्याचमुळे दक्षिण धृवावर लँडर उतरवलं जाईल.
मिशन चांद्रयान 3 यशस्वी झालं तर अवकाश संशोधनात भारत एक मोठा टप्पा गाठेल. दक्षिण धृवावर आपलं यान पाठवणारा भारत हा पहिला देश ठरेल.
आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्रावर उतरेल. लँडिंगच्या दोन तासआधी लँडिंग मॉड्युलची तपासणी केली जाईल. ही तपासणी पूर्ण झाली अन् कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. तर लँडिंग आजच केलं जाईल.